विज्ञान अविष्कार नगरीस राजीव गांधी यांचे नाव देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन….. सचिन साठे

रोहित खर्गे,विभागीय संपादक

पिंपरी- दि. ३ सप्टेंबर २०२१ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत जागतिक दर्जाची “भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी” उभारण्यास बुधवारी महविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे असे पत्रक पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
बुधवारी (दि. 1 सप्टेंबर) मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीत विज्ञान नगरीसाठी आठ एकर जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. यापैकी एक एकर जागेवर यापूर्वीच सायन्स पार्क उभारण्यात आले आहे. उर्वरित सात एकर जागेवर “भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार” नगरी उभारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यासाठी येणाऱ्या 191 कोटी रुपये खर्चास देखील यावेळी मान्यता देण्यात आली. ही अविष्कार नगरी जागतिक दर्जाची होणार असून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित पूरक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. एकविसाव्या शतकात भारत महासत्ता होण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानावर अधिक कुशल मनुष्यबळ उभे करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी, त्यांच्या अनुषंगिक जिज्ञासा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मार्फत वाढीस लागण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकण्यासाठी, त्याचे अनुभवाद्वारे शिक्षण मिळण्यासाठी विविध संकल्पनांवर आधारित सादरीकरण आणि प्रदर्शन यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आर्थिक महासत्ता होण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यासाठी संगणक क्षेत्राची उभारणी केली. त्यामुळेच भारतात संगणक क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, दूरसंचार व दळणवळण क्षेत्रात वेगाने प्रगती झाली आणि लाखो लोकांना यातून रोजगार मिळाला. तसेच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ झाली. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी दूरदृष्टी असणाऱ्या स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे ही विज्ञान अविष्कार नगरी उभारणे हे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद आहे असेही सचिन साठे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *