आशाताई बुचके यांचा माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश…

दि. १९ ऑगस्ट २०२१
जुन्नर :
बातमी : किरण वाजगे – कार्यकारी संपादक

जिल्हा परिषदेमध्ये सतत चार वेळा भरघोस मतांनी निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत आज ठराविक कार्यकर्त्यांच्या समवेत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून रंगलेल्या या नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे. 
                 २००९ तसेच २०१४ या दोन विधानसभा निवडणुका शिवसेना पक्षाकडून लढलेल्या आशाताई बुचके यांची २०१९ च्या विधानसभा निवडणूकीआधीच शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तरीही २०१९ ची विधानसभा निवडणुक अपक्ष लढवत आशाताई बुचके यांनी ५० हजारांहून जास्त मते घेत आपली ताकद दाखवून दिली.


        या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी ७४ हजार ९५८ मते मिळविली. माजी आमदार शरद सोनवणे यांना ६५ हजार ८९० मध्ये मिळाली होती. तर आशाताई बुचके यांना ५० हजार ४१ मते मिळाली होती. पुणे जिल्ह्य़ात शिवसेना पक्षात वाघीण म्हणून ओळख असणाऱ्या आशाताई बुचके ह्या तश्या मुळच्या भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खास समर्थक आणि कार्यकर्त्या होत्या.
           सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुढील निवडणूका एकत्र लढून जागा वाटप जर विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहे त्या पद्धतीने जर झाले तर शिवसेना पक्षाची घरवापसी करूनही फायदा होणार नाही. कारण जागा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल हे धोरण लक्षात ठेवूनच आशाताई बुचके यांनी हा निर्णय घेतला असणार यात काही शंका नाही. मात्र आशाताईंच्या रूपाने तालुक्याच्या राजकीय चिखलात भाजपचे हे कमळ फुलणार कि मालवणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आपला आवाज साठी कार्यकारी संपादक किरण वाजगे, मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *