रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी, दि. १ जून २०२१
शहरामधील अति वयोवृध्द व अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांचे घरी जाऊन सुलभ रित्या कोविड लसीकरण करण्यासाठी महापालिकेने मोहिम हाती घेतली असून आज प्रत्यक्षरित्या अशा व्यक्तींच्या घरी जावून त्यांच्या कोविड लसीकरणाची महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
सांगवीतील ढोरे नगर येथे ७५ वर्षीय व्यक्तीचे लसीकरण त्यांच्या घरी जाऊन महापौरांच्या उपस्थितीत तर, बिजलीनगर येथील रेल विहारमधील ८८ वर्षीय व्यक्तीचे लसीकरण सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, तालेरा रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. विद्या फड-मुंढे, डॉ. सीमा बडे-मोराळे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मायक्रोप्लानिंग करून प्रभागस्तरावर कोविड दक्षता समित्यांची स्थापना करण्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी सूरू करण्यात आली आहे. ना गरिकांचे कोरोना पासून संरक्षण व्हावे यासाठी मोठया प्रमाणावर लसीकरण करण्याचे उददीष्ट महापालिकेने हाती घेतले आहे. लसींची उपलब्धतेनुसार दैनंदिन लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन केले आहे. लसीकरण केंद्रांवर येवून लस घेवू न शकणा-या पिंपरी चिंचवड शहरामधील अति वयोवृध्द व अंथरुणावर खिळलेल्या तसेच गतिमंद नागरिकांचे घरी जाऊन सुलभरित्या कोविड लसीकरण करण्याची कार्यवाही सूरू झाली आहे.
घरी जाऊन कोविड लसीकरण करणा-या कर्मचा-यांच्या पथकाला वाहतुकीकरीता सी.एस.आर.च्या माध्यमातून वाहनांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. यासाठी उबेर कंपनीने पुढाकार घेतला असून त्यांच्याकडून दहा चारचाकी वाहने मोफत स्वरूपात वापरासाठी दिली आहेत. याबददल महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी उबेर कंपनीच्या व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
शहरामधील अति वयोवृध्द व अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांचे घरी जाऊन सुलभ रित्या कोविड लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या मी जबाबदार या अधिकृत ऍपवर नोंदणी करण्याचे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.