नाणेघाट परिसरात तरुणीचा पाय घसरून मृत्यू..

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाटाजवळील जीवधन किल्ला पाहून खाली उतरत असताना दिल्ली येथील पर्यटक तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ४ रोजी) घडली. या सर्व परिसरात पर्यटनाला बंदी असूनही अतिउत्साही पर्यटक पोलीस यंत्रणेला झुगारून किंवा दंड भरून येथे येत आहेत.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जीवधन गडावरून उतरताना निसरड्या झालेल्या पायरीवरून ही तरुणी शेजारील दरीत पडली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीस सहकाऱ्यांनी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे घोषित केले.
या दुर्घटनेतील मृत तरुणीचे नाव रुचिका सेठ (वय ३० रा. दिल्ली) असल्याची माहिती
जुन्नर पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. ही तरुणी दिल्लीहून ठाणे येथे आली होती. मुंबईहुन इतर तिघांसह ही तरुणी मोटारसायकलने नाणेघाट येथे मुक्कामास आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हे चौघे जीवधन किल्ल्यावर गेले होते. मागील आठवड्यात याच परिसरात पोलिसांना अरेरावीची भाषा वापरणाऱ्या पुणे येथील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये. व कोरणा विषाणू च्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *