प्रभाग क्र ११ मधील कुदळवाडी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळेचे उद्घाटन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. २ ऑगस्ट २०२१ संगणकाच्या आजच्या आधुनिक युगात महानगरपालिकेच्या शाळातून देखील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण प्राधान्याने देण्यात येत असून त्यामुळे भविष्यात महापालिका शाळांमधून अनेक संगणक तंत्रज्ञ, संगणक अभियंते निर्माण होतील असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.

महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र ११ मधील कुदळवाडी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळेचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसदस्य एकनाथ पवार, संजय नेवाळे, नगरसदस्या योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे, माजी नगरसदस्य भिमा बोबडे, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आनंदा यादव उपस्थित होते.

कुदळवाडी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीचे जागेचे क्षेत्रफळ २११२ चौरस मीटर असून त्यावर १६७९ चौरस मीटरचे तळमजला अधिक ३ मजले असे बांधकाम आहे. त्यामध्ये २४ खोल्या असून त्यात १६ वर्ग खोल्या, चित्रकला कक्ष, शिक्षक कक्ष, प्रशासन कक्ष, ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा सभागृह आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. संगणक शिक्षणाकरीता ई-लर्निंगद्वारे शिक्षणाची सोय आहे. या शाळेसाठी सुमारे ४ कोटी ६० लाख रुपये इतका खर्च झालेला आहे.

महापौर माई ढोरे म्हणाल्या शिक्षणाचा स्तर व्यक्तीची सामाजिक आणि कौटुंबिक ओळख वाढवतो. शिक्षणामुळे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय समस्यांवर मात करण्याकरीता क्षमता मिळते असे सांगून त्यांनी त्यांच्या भाषणात या भागातील शिक्षण घेणा-या मुलामुलींना शाळेकरीता दूर- दुर पर्यंत जावे लागायचे, विद्यार्थ्यांची गैरसोय व्हायची याचा विचार करुन प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून महापालिकेने या ठिकाणी बांधलेल्या शाळेमुळे याभागातील मुलामुलींची शिक्षणाची सोय सुलभ होणार आहे तसेत वेळेचीही बचत होणार आहे असेही त्या म्हणाल्या आणि या शाळेकरीता जागा देणारे बबन मोरे, संदेश मोरे आणि सुभाष मोरे यांचा सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्या योगिता नागरगोजे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *