निगडी भक्ती शक्ती उड्डाणपुलावर महापालिकेला अजुन किती मृत्यू हवे आहेत ? सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा संतप्त सवाल

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी: दि ३१ जुलै २०२१
निगडी येथील भक्ती-शक्ती समुहशिल्प चौकात पुर्वीपासुनच अनेक निष्पाप नागरिकांच्या अपघाती मृत्युची मालिका सुरू होती ती बंद व्हावी, सुरक्षित वाहतुक व्यवस्था असावी अपघाती मृत्यू होऊ नये म्हणुन भक्ती शक्ती येथे रोटरी उड्डाणपुलाची मागणी होऊ लागली व ती आज पुर्णत्वाकडे जात असतानाही अपघाती मृत्यु होतच आहेत. त्यामुळे उपाययोजना अभावी ‘मौत का कुआ’ ठरलेल्‍या भक्ती शक्ती उड्डाणपुलावर महापालिकेला अजुन किती मृत्यू हवे आहेत? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केला आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खैरनार यांनी म्हटले आहे की,भक्ती शक्ती उड्डाणपुलावरील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अजूनही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे मागील काही महिन्यांपासून येथे अपघातांची मालिका सुरू असून यात अनेकांना मृत्यूच्या दाढेत जावे लागले आहे. तर काहींच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले. दरम्यान निगडी भक्ती शक्ती उड्डाणपूलाच्या कामातील अनेक त्रुटी व दोष वाहनचालक व प्रवाशांच्या मूळावर उठले आहेत. याबाबत अनेक तक्रारी येऊन देखील कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. रंबलर गतिरोधक, दिशादर्शक फलक, वाहतूक सिग्नल अद्यापही उड्डाणपुलावर नाहीत. तसेच दि.३०जुलै २०२१ रोजी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात अकबर अली सिद्दीकी ( वय ४५ रा.रुपीनगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उड्डाणपुलावर अपघात वाढलेले असताना नागरिकांच्या जीवन मरणांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाबद्दल वाहनचालक व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.आत्तापर्यंत या ठिकाणी तिघांचा नाहक बळी गेला आहे. भक्ती शक्ती उड्डाणपूल अपघाताचे केंद्र झाला आहे. त्यामुळे मा. आयुक्तांनी वाहतूक पोलिस व पोलिस अधिकाऱ्यांसमवेत निगडी भक्ती-शक्ती उड्डाणपुलाची पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *