शिरूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने शिस्तभंग केल्याने पोलीस अधीक्षकांनी केले निलंबन…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 29/07/2021
      शिरूर पोलीस स्टेशन येथे नुकतीच बदली झालेला व आय जी म्हणून सर्वांना ओळख सांगणारा, इब्राहिम गणी शेख या पोलीस कर्मचाऱ्याचे ऐकावे तेवढे किस्से व कारनामे कमीच आहेत. स्वतःच रंगवून किस्से सांगणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याची, सेवेतील कारकीर्दही तेव्हडीच वादग्रस्त आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी या पोलीस कर्मचाऱ्याने कर्तव्य बाजावलेले आहे, तेथील किस्से सर्वश्रुत झाले आहेत.
      ऐन कोव्हिडच्या काळात म्हणजे अलीकडील अगदी काही महिन्यांत या पोलीस कर्मचाऱ्याची बदली, शिरूर पोलीस स्टेशन येथे झाली होती. बोलण्यात माहिर असलेले आय जी शेख हे ज्यावेळी स्वतःच्या तोंडाने, स्वतःच्या संदर्भात घडलेले आत्तापर्यंतचे अनेक किस्से लोकांना जगजाहीर करायचे, तेव्हा मात्र एकच हशा पिकत असल्याचे अनेकांनी सांगितलेय. त्यातील काही किस्से तर थेट अधिकाऱ्यांच्या बाबतही घडलेले असल्याचे, शेख यांनी लोकांना गंमतीने सांगितले होते.
हे सर्व किस्से घडले होते, ते फक्त आय. जी. या अद्याक्षरांमुळे.
हे महाशय समोरच्याला फोन केल्यावर “मी, आय जी ….. शेख बोलतोय” असे म्हणत असल्याने, समोरच्याची पाचावर धारण बसल्याशिवाय राहत नसावी. कारण पोलीस खात्यात आय. जी. हे पद खूप महत्वाचे व मुख्य असल्याने, समोरचा फोनवरील व्यक्ती घाबरल्याशिवाय राहत नसेल हे तर नक्कीच.
एकदा तर चक्क जेलर नेच यांना सॅल्युट केल्याचा किस्सा ऐकिवात आहे. कारण, हे महाशय होते आय जी शेख.
     
      पहाडी आवाज असणारा हा पोलीस कर्मचारी, दिसायलाही उंचापुरा व धिप्पाड. बोलतानाही अगदी भरपूर कॉन्फिडन्स. योग्यवेळी योग्य व समर्पक डायलॉग. त्यामुळे समोरच्यावरही छाप पाडणारी ही व्यक्ती.
मात्र शिरूर पोलीस स्टेशन मध्ये रुजू झाल्यावर नको तिथे लक्ष घालणाऱ्या, या पोलीस कर्मचाऱ्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या होत्या. वाळू व्यावसायिक व दोन नंबर धंदेवाल्यांशी आधीपासूनच ओळखी असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने, शिरुरला अतिघाईने आपले पाय रोवून माया जमविणे सुरू केल्याच्या खबरा, स्थानिक पोलिस अधिकारी व अगदी वरिष्ठांकडे लगेचच गेल्या आणि त्यामुळे या आय जी महाशयांच्या अडचणी वाढल्या.
पुणे ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना या तक्रारींमध्ये सत्यता आढळून आल्याने, या वादग्रस्त पोलीस कर्मचारी आय जी शेख चे निलंबन करण्यात आले असून, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. असे अनेक भामटे पुणे ग्रामिणच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये आहेत अशी चर्चा आता होताना दिसत असल्याने, आणखी किती भामट्यांच्या तक्रारी पुढे येतील याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
एक मात्र खरे, की पुण्याला रुजू झाल्यापासून एस पी साहेबांनी अवैध्य धंदे व ते करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात व धडाकेबाज कारवाया केल्याने, सर्वसामान्य जनता मात्र त्यांच्या कार्यावर बेहद खुश आहे.
शिवाय, त्यांनी अनेक वर्षांपासून पेंडिंग गुन्ह्याच्या फाईल्स काढून, ऐन कोव्हिडच्या काळातही कोंबिंग ऑपरेशन करून, जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने, थोड्याच दिवसात ते पुणेकरांचे लाडके झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लोक थेट पुण्याला एस पी ऑफिस गाठून, आपल्यावरील झालेले अन्याय त्यांच्यासमोर मांडत आहेत. त्यात, त्यांच्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या जरी तक्रारी असल्या, तरी वेळेला कर्तव्यकठोर बनत त्यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांचेही निलंबन केले आहे. त्यामुळे आपल्या लोकांच्या चूका पाठीशी न घालणारे पोलीस अधीक्षक, यांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
आता जे पोलीस कर्मचारी शिस्तभंग करतील किंवा कर्तव्यात कसूर करतील त्यांची मात्र खैर राहणार नसल्याने, पुण्याचे पोलीस खाते सरळ झाल्याशिवाय राहणार नाही हीच चर्चा होत आहे.
एकीकडे पुण्याचे पालक मंत्री असणारे व राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे व प्रशासनावर कडक पकड असणारे अजित दादा पवार, तसेच राज्याचे गृहमंत्री असणारे व कर्तव्यकठोर व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप वळसे पाटील, हे दोघेही चुकीला थारा देत नसल्याचे व परखडपणे न्याय देणारे म्हणून ओळख असल्याने, ग्रह विभागातील असे काही चुकीचे वागणारे पोलीस कर्मचारी व ग्राहखात्याला लागलेल्या अशा काही किडी, मुळापासून घालवल्याशिवाय ते राहणार नाहीत, हे मात्र नक्की.
कारण, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे घनिष्ठ संबंध, हे थेट गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबरोबर असून, हे लोक एकमेकांच्या फोर व्हीलर मध्ये फिरत असल्याच्या तक्रारी, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे नागरिकांनी व पत्रकारांनी याआधीच केलेल्या होत्या.
तर, अजूनही काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोर व्हीलरच्या काचा या अगदी काळ्याकुट्ट असून, आर टी ओ चे नियम त्यांना नाहीत की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
त्यामुळे, खरच आता ग्रह विभाग व वरिष्ठ अधिकारी, या अशा कर्मचाऱ्यांच्या बाबत काय काय कठोर पावले उचलतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *