खासदार श्रीरंग बारणे यांची पुणे महानगर नियोजन समितीवर नियुक्ती…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- २० जुलै २०२१
राज्य सरकारने गठित केलेल्या पुणे महानगर नियोजन समितीवर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष निमंत्रित सदस्य म्हणून खासदार बारणे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आगामी पाच वर्षांसाठी समितीचे गठन करण्यात आले असून राज्याच्या नगरविकास विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

पुणे महानगर क्षेत्र म्हणून २१ऑगस्ट २०१८ रोजी घोषित करण्यात आले. शासनाने नामनिर्देशित सदस्यांची घोषणा करून पुणे महानगर नियोजन समिती गठीत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील पुणे महानगर नियोजन समितीमध्ये संसद आणि विधिमंडळ सदस्यांमधून शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विधानसभा सदस्यांमधून मावळचे आमदार सुनील शेळके आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पुणे महानगर नियोजन समितीवर काम करण्याची संधी दिल्याबाबत मी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. समितीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करता येईल. प्रारुप आराखडा केला जाईल. मावळ, पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांसाठी प्राधान्य देणार आहे. शहराचा समतोल, सर्वंकश विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *