महाराष्ट्रातील महापौरांची २२ वी ऑनलाईन परिषद..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. १५ जुलै २०२१ कोरोनाच्या प्रार्दुभाव कमी झाला असल्याने, महापालिका सभा ऑनलाईन न घेता त्या पूर्वीप्रमाणे सभागृहात घेण्याची आवश्यकता आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रातील महापौरांची २२ वी ऑनलाईन परिषद आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये सहभागा दरम्यान महापौर माई ढोरे यांनी आपले मत व्यक्त केले. बैठकीत महानगरपालिकांचे महापौर, सभागृह नेता व विरोधी पक्ष यांना दरमहा वेतन देण्यासाठी महानगरपालिका अधिनियमात दुरुस्ती करण्यासंबंधी आणि महापौरांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद करण्यासाठी राज्य शासनास विनंती करणे आदी विषयांचा समावेश होता.

महापौर माई ढोरे म्हणाल्या पिंपरी चिंचवड शहराने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. वैद्यकीय अधिकारी, फ्रंटलाईन वर्कर्स, वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, विविध वयोगटातील नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, वयोवृध्द व जर्जर अवस्थेतील नागरिक, पत्रकार, परदेशी जाणारे विद्यार्थी, तृतीयपंथी यांचेकरीता विशेष लसीकरण मोहिम राबवून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. असे सांगून सद्यस्थितीत शहराला मागणीच्या तुलनेने कमी लसींचा पुरवठा होत आहे याचा शासनाने विचार करुन मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करुन द्याव्यात असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.

महानगरपालिका निवडणूकांना काही महीन्यांचा कालावधी उरलेला असल्याने लोकप्रतिनिधींना त्यांचे मत मांडण्यासाठी, चर्चा करण्यासाठी सभागृहाचे कामकाज ऑनलाईन पध्दती ऐवजी प्रत्यक्ष सभागृहामध्ये सहभाग घेऊन करावे यासाठी परिषदेत उपस्थित सर्व महापौरांनी प्रयत्न करावेत असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.

या परिषदेमध्ये विविध महानगरपालिकांच्या महापौरांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षा तथा महापौर, बृह्नमुंबई महानगरपालिका, मुंबई किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीचे प्रास्ताविक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी केले तर आभार महाराष्ट्र महापौर परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके यांनी मानले.