एका अपत्यावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्यांचा सत्कार…यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा उपक्रम

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि १२ जुलै २०२१
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांच्या वतीने राष्ट्रीय कुटूंब कल्याण अभियान अंतर्गत एका अपत्यावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्यांचा यथोचित सत्कार डॉ. रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते वात्सल्य हॉस्पिटल लांडेवाडी येथे ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे होते तर प्रमुख अतिथी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे होते. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुदाम मोरे, लायन्स क्लब भोजापूर अध्यक्ष सुरेखा साबळे उपस्थित होते.
कवी सुरेश कंक यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला लडकी हो गयी यारो, कोई गम नही करना..लडकी कम नही होती मेरे भाई याद रखना.. बडा परिवार वहा बेबसी छोटा परिवार वही है खुशी.. बढती हुई आबादी करेगी बरबादी.. ही हिंदी गीतरचना सादर केली. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे विभाग प्रमुख राजेंद्र वाघ यांनी ‘हम दो हमारा एक’ हे घोषवाक्य न राहता कृतीशील कार्यक्रम व्हावा अशा भावना व्यक्त केल्या.


महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले – कुटुंब नियोजन कार्यासाठी आयुष्यभर काम केलेले पहिले डॉ रघुनाथ धोंडो कर्वे यांचा आदर्श घेऊन संस्था जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून गेल्या अनेक वर्षांपासून हा राष्ट्रीय कुटूंब कल्याण उपक्रम राबवित आहे..
डॉ रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सौ हेमलता व श्री मोहन साबळे, सौ दीप्ती व श्री आनंद कुलकर्णी, सौ शारदा व श्री लीलाचंद पाटील या एका अपत्यावर शस्त्रक्रिया केलेल्या दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ रोहिदास आल्हाट म्हणाले.. आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटींवर जाऊन पोहचली आहे. लोकसंख्या आधिक असल्याने भूक, बेकारी, दारिद्र्य, उपासमार यासारख्या असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. कुटूंब कल्याण अभियानात महिलांचा आधिकाधिक सहभाग असणे आणि त्यांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने स्रियांनी कॉपर टी चा वापर, पुरुषांनी निरोधचा वापर करणे आवश्यक आहे. यापुढील काळात कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना सर्वोतोपरी सहकार्य राष्ट्रीय कर्तव्य म्हणूम करण्याचा निर्धार डॉ रोहिदास आल्हाट यांनी व्यक्त केला. प्रा दिगंबर ढोकले यांनी सुत्रसंचलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *