नारायणगाव येथे नामवंत कंपनीचा लोगो वापरून बनावट आटा चक्क्या विकणाऱ्यावर पोलिसांचा छापा…

१४ लाख ९७ हजार रुपये किमतीच्या १७५ आटा चक्क्यांना सील

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
कोहिनूर आटा चक्की या नामवंत कंपनीचा बनावट लोगो वापरून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या तब्बल १७५ चक्क्यांना नारायणगाव पोलिसांनी सील लावले आहे. या कारवाईमध्ये सुमारे १४ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचा माल जागेवरच सिल करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.


याबाबत कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नारायणगाव उपबाजार केंद्रासमोर असलेल्या गडाख मशिनरीज चे मालक सुधीर प्रकाश गडाख (वय ३७) राहणार संगमनेर जिल्हा नगर यांच्यावर नारायणगाव पोलिस स्थानकात बुधवार दिनांक ७ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणगाव येथील विनोद सेल्स कार्पोरेशन चे मालक पराग अशोककुमार शहा यांनी २०१९ साली कोहिनूर ब्रँड बरोबर रजिस्ट्रेशन व कॉपीराइट हक्क मिळवले आहेत. या अनुषंगाने कोहिनूर ब्रँडच्या आटा चक्की विक्रीचा व त्या बनवण्याचा अधिकार विनोद सेल्स कार्पोरेशनलाच आहे. जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रासमोर असलेल्या गडाख मशिनरीज या दुकानात कोहिनूर कंपनीचे नाव वापरून बनावट आटा चक्क्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार पराग शहा यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी गडाख मशिनरी या दुकानाची तपासणी केली असता या दुकानात कोहिनुर ब्रँड हे नाव वापरून १७५ आटा चक्क्या विक्रीसाठी ठेवलेल्या आढळल्या. यामध्ये ११ लाख २२ हजार रुपये किंमतीच्या एक एचपी च्या विविध रंगाच्या १३२ आटा चक्क्या, तसेच ७१ हजार ५०० रुपये किमतीच्या एक एचपी च्या वेगवेगळ्या रंगाच्या ११ आटा चक्क्या व ३ लाख ४ हजार रुपये किमतीच्या दोन एचपी च्या वेगवेगळ्या रंगाच्या ३२ आटा चक्क्या अशा एकूण १४ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या १७५ बनावट आटा चक्क्या आढळून आल्या.
या सर्व चक्क्या गडाख मशिनरीज या दुकानात पोलिसांनी सील करून ठेवल्या असून कोहिनूर कंपनीचे बनावट लोगो वापरून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुधीर गडाख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertise


या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पुढील तपास करीत आहे.


दरम्यान कोहिनूर कंपनीचा लोगो वापरून अशा प्रकारे बनावट आटा चक्क्या विकणाऱ्या आळेफाटा नारायणगाव तसेच इतर ठिकाणी विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या घटनेतील फिर्यादी पराग शहा व सुहास शहा यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *