नियमबाह्य कामे, कामचुकारपणा , निकृष्ट दर्जाचे काम केल्यास करणार कारवाई- आयुक्त राजेश पाटील यांचा इशारा…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. ९ जून २०२१
नियमबाह्य कामे, कामचुकारपणा आणि निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला. प्रत्येक कामाचे ऑडीट केले जाणार असून निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्याची दक्षता सर्व अधिका-यांनी घ्यावी असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. १० आणि १४ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीस अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या मंगला कदम, वैशाली काळभोर, अनुराधा गोरखे, मीनल यादव, नगरसदस्य तुषार हिंगे, केशव घोळवे, प्रमोद कुटे, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहशहर अभियंता प्रविण लडकत, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सुनिल वाघुंडे, रामनाथ टकले, अनिल शिंदे, संदेश चव्हाण, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता साळवे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एस. शिंदे आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग स्तरावर चाललेली कामे, येथील समस्या, प्रश्न तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन, अतिक्रमण अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. जीर्ण वृक्षांची छाटणी, विद्युत तारांवर तसेच धोकादायक ठरणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी, हॉकर्सचे अतिक्रमण आणि व्यवस्थापन, ट्रांझिट कॅम्प, पाणी पुरवठा नियोजन याबाबत नगरसदस्यांनी विविध मुद्दे मांडले. नाल्यांची कामे तातडीने करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, पदपथावरील अतिक्रमण हटवावे, चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून त्यावर तात्काळ कारवाई करावी, शाहूसृष्टी, सायन्स पार्क येथील तारांगण, विविध उद्यानांची कामे, रेंगाळलेली कामे, बर्ड व्हॅलीतील कामे, नालेसफाई, जलनि:सारणची कामे तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी मांडल्या.

बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. महसुली कामांचे नियोजन करुन ते वेळेत पार पाडावे. नालेसफाईचा साप्ताहिक अहवाल क्षेत्रीय अधिका-यांकडे नियमित सादर करावा, विविध विभागांशी संबंधित असलेल्या कामांबाबत एकत्रितपणे स्थळ पाहणी करुन कामाचे नियोजन करावे. तसेच विभागांतर्गत समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या.

शहरातील हॉकर्सचे नियोजन करण्याचे काम सुरु असून प्रत्येक भागाचा विचार करुन याबाबत व्यवस्थापन केले जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात येत आहे असे आयुक्त पाटील म्हणाले. अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करुन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिले. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन सुरु असून कोविड दक्षता समिती स्थापन केली जात आहे. या समितीच्या कामकाजाबद्दल आयुक्त पाटील यांनी बैठकीत माहिती दिली. कोविडचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले. अधिकारी कर्मचा-यांनी चांगले काम करावे, नागरिकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना वेळेत दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा असतो त्यामुळे आपण तात्काळ उपलब्धता दाखविली पाहिजे असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल डॉ. सुजाता साळवे यांनी बैठकीत माहिती दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *