बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
पारनेर : दि. 04/06/2021
पारनेर तालुक्यातील दरोडी या गावामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेची चाहुल लागताच, दिनांक ७ मे २०२१ रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व उद्योजक रामदास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, गावामधे कोविडकेअर सेंटरची उभारणी करण्यात आली.
दिनांक ४ मे रोजी गावामध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्यामुळे, खबरदारी म्हणुन गावामधे कोव्हिडसेंटर उभारण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व संस्थांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत, कोव्हिडसेंटर उभारण्यासाठी प्रयत्न केले व त्यासाठी रामदासशेठ भोसले यांनी सर्वप्रथम ५० हजार रुपयांची मदत दिली. त्याआधी आसपास च्या गावामध्ये मार्च, एप्रिल महिन्यापासून कोरोना बाधित रुग्ण मिळत होते. त्यामुळे गावामध्ये खबरदारीचे उपाय म्हणून मास्क, सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करण्यात आली. नागरिकांना जमावबंदीसाठी अटकाव केला गेला. योग्य वेळेमधे गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार व दुकाने बंद ठेवली गेली. नागरिकांना पारनेरच्या कार्यक्षम तहसीलदार ज्योती देवरेमॅडम, ज्या सुचना देतील त्या सुचना गावच्या सार्वजनिक ध्वनी क्षेपकाद्वारे अनाऊन्स करुन रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ लोकांना ऐकवण्यात येत होत्या.
तसेच शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियम अटींचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती करण्यात आली आणि तशी कार्यवाही सुध्दा झाली. गावातील प्रत्येक वार्डनुसार टिम तयार करण्यात आली. टिमने प्रत्येकाच्या घरी जाऊन कोणी आजारी असल्याची वेळोवेळी चौकशी करत त्यांना वेळेत उपचार घेण्यास भाग पाडले. तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महाविद्यालयीन कर्मचारी, शिक्षक, प्राथमिक शिक्षक व कोरोनासाठी केलेली कमिटी यांच्या माध्यमातून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अंतर्गत संपूर्ण गावाच्या नागरिकांचे आरोग्य तपासणी करुन, आजारी रुग्णांची वेळेत काळजी घेण्यात आली. सर्वांची थर्मल टेस्ट, आॅक्सीजन लेवलची तपासणी वेळोवेळी करण्यात येत होती. आसपासच्या सर्व गावांमध्ये दोन महिन्यांपासुन रुग्ण मिळत होते, पण दरोडी हे एक असं गाव होतं, कि दिनांक ४ मे रोजी पहिला पेशंट सापडला व त्यानंतर अवघ्या २२ दिवसांमध्ये, दरोडी गाव कोरोना मुक्त झाले.
हे सर्व करत असताना, गावामध्ये कोविड सेंटरची उभारणी केली. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करुनच त्यांना गावामध्ये प्रवेश दिला. आजारी रुग्णांना ताबडतोब विलगीकरण कक्षात ठेवले. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ऍडमिट केले. पाॅझीटिव्ह रुग्णांच्या घरांमधील लक्षणे असणाऱ्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियम व अटींचे काटेकोरपणे पालन केले. नागरिकांनाही नियमांचे सक्तीने पालन करण्यास भाग पाडले. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीमध्ये आमचे गाव कोरोना मुक्त करण्यास आम्ही ग्रामस्थ यशस्वी झालो असल्याची माहिती सरपंच सुमन पावडे यांनी दिली. या कामासाठी त्यांना उपसरपंच शरद कड, माजी सरपंच अनिल पावडे, सोसायटी चेअरमन राजेश पावडे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावातील सर्व सस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावात स्थापन करण्यात आलेल्या कोरोना समितीचे मोलाचे सहकार्य लाभले. तालुक्यामध्ये अत्यंत कमी कोरोना बाधित रुग्ण असलेलं गांव म्हणजे दरोडी गाव म्हंटले तरी वावगं ठरणार नाही. दिनांक २४ मे पासून आजतागायत गावामध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहीती माजी सरपंच अनिल पावडे यांनी दिली.
या सर्व कामासाठी योगदान दिलेल्या ग्राममसेवक, तलाठी, शिक्षक, ग्रामस्थ, कोरोना समिती, महीला भगीनी, तरुण सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभलेय. गावच्या एकीमुळे व सर्वांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झालेय. अशीच गावची एकी कायम ठेवत भविष्यामध्येही, गांवच्या विकासासाठी काम करुयात असे अहमदनगर जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदासशेठ भोसले यांनी सांगीतले.