मुबंई
दि.03/06/2021
केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेत आपल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज मार्गी लागला. मांडवी नदीवर तीन बंधारे बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील साहेबांनी आज दिले.
जुन्नर तालुक्याच्या आदिवासी क्षेत्रातील कोपरे गावाची वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. त्यानुसार मांडवी नदीवर साडेतीन एमसीएफटी क्षमतेचे बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता कुशिरे यांना दिले. गेल्या वर्षभरापासून कोपरे येथील हळाची लामटी साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते.
परंतु गतवर्षी देशात कोविड संकट आल्यामुळे हा प्रश्न रखडला होता. पाठोपाठ आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे या संदर्भातील बैठक अधिक काळ लांबली. परंतु मी व खा.अमोल कोल्हे आम्ही चिकाटीने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आज झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला.
आमच्या सामूहिक प्रयत्नांना यश मिळाले असून कोपरे, मांडवे, मुथाळणे व जांभुळशी इत्यादी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. आदर्श ग्राम योजनेत गाव दत्तक घेण्याचा विषय आला तेव्हा अविकसित राहिलेल्या आदिवासी भागातील कोपरे गावाची निवड खा.अमोल कोल्हे यांनी केली होती.
मुंबई मंत्रालयात झालेल्या या बैठकीला माझ्यासमवेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे , जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनील कुशिरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.