शिरूर । निःशुल्क उपचाराच्या शासकीय योजनेचा लाभार्थी असूनही, हॉस्पिटलच्या आडमुठी धोरणामुळे व अवाजवी बिल भरण्यासाठी, पत्नीचे मंगळसूत्र ठेवावे लागले गहाण – तक्रारदार.

      महात्मा फुले जनआरोग्य योजनेस पात्र असतानाही, शिरूर येथील माऊली हॉस्पिटल व प्रसूतिगृहाकडून, येथे उपचार घेत असणाऱ्या रुग्णांकडून अवाजवी बिल घेतल्याची तक्रार व इतरही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.


येथे उपचार घेत असताना, या रुग्णालयात रुग्णाला कसल्याही प्रकारच्या सुविधा मिळाल्या नसल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली असून, या रुग्णालयावर शासनाने कडक कारवाई करण्याच्या मागण्याही होत आहेत. या रुग्णालयाबाबत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी असल्याचे आता समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने, राज्यातील सर्वसामान्य जनतेला विविध आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे निःशुल्क व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा म्हणून, महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली. दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अशा दोन्ही घटकांसाठी ही योजना लागू आहे.
ही योजना शिरूर शहरातील माऊली हॉस्पिटलमध्येही लागू आहे.
याबाबत, या हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश आंधळे यांनी स्वतः सोशल मीडियावर जाहिरात केलेली होती. हीच जाहिरात पाहून, शिरूर येथील बाबुराव नगरचे रहिवासी देवेंद्र महामुनी यांनी आपल्या पत्नीला या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याचे ठरविले. त्यानुसार दि. १९ एप्रिल २०२१ रोजी माऊली हॉस्पिटल मधील आरोग्यमित्राशी संपर्क साधून, आपल्या पत्नीला माहुमुनी यांनी या रुग्णालयात दाखल केले होते.
या योजनेसाठी लागणारे रेशनिंग कार्ड दोन दिवसात जमा करतो, असे महामुनी यांनी आरोग्य मित्र व डॉक्टर सतीश आंधळे यांना सांगितले होते. याबाबत मदत व्हावी म्हणून महामुनी यांनी आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे व रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांच्याशी संपर्क साधला होता. रेशनिंग कार्ड जमा करण्यासाठी महामुनी यांना दोन दिवसांचा अवधी द्यावा अशी विनंती काळे यांनी डॉक्टर आंधळे यांच्याकडे केली होती. डॉक्टर आंधळे यांनी यास सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र प्रत्यक्षात डॉक्टर आंधळे यांनी महामुनी यांच्याकडे बिल भरून डिस्चार्ज घेण्यासाठी तगादा लावला. डॉक्टर काही ऐकेनात म्हणून नाईलाजास्तव महामुनी यांनी आपल्या पत्नीचे गंठण मोडून रुग्णालयाचे बिल अदा केले. दुसऱ्या दिवशी महामुनी यांना रेशनिंग कार्ड प्राप्त झाल्यावर, त्यांनी रुग्णालयातील आरोग्य मित्राकडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून द्या व बिलापोटी जमा केलेले माझे पैसे परत करा, अशी विनंती केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर आंधळे यांनी, महामुनी यांचे काही ऐकून न घेण्याच्या सूचना आरोग्य मित्राला करून, महामुनी यांना तेथून हुसकावून दिले. हा सर्व प्रकार महामुनी यांनी काळे व कर्डिले यांच्या कानावर घातला. या आधीही डॉक्टर आंधळे यांच्या अशा प्रकारच्या नकारात्मक वागणुकीच्या अनेक तक्रारी काळे व कर्डिले यांच्याकडे आल्या आहेत.

   डॉक्टर आंधळे हे रुग्णांना जाणीवपूर्वक महात्मा फुले जन आरोग्य योजनेपासून वंचित ठेवत असून, येथे रुग्णांना होत असलेल्या गैरसोयीबाबत, आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे काळे व कर्डीले यांनी सांगितलेय. 
   याबाबत तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय शिरुरचे वैद्यकीय अधीक्षक, तसेच शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही तक्रार अर्ज देण्यात आल्याचे काळे व कर्डिले यांनी सांगितलेय. 
   शिरुरचे निवासी नायब तहसीलदार, श्रीशैल व्हट्टे यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी काळे व कर्डीले यांच्यासमवेत, नारी शक्ती संस्थेच्या अध्यक्षा शारदा भुजबळ याही उपस्थित होत्या.

    काळे व कर्डिले यांच्या म्हणण्यानुसार —– (“महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभार्थ्यांना निःशुल्क उपचार व सुविधा देणे रुग्णालयांना  बंधनकारक आहे. माउली रुग्णालयात मात्र रुग्णांकडून लॅबोरेटरी चार्जेस तसेच मेडिसिन चार्जेसच्या माध्यमातून, पैसे उकळले जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. या योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांना, जणू काही रुग्णालय त्यांच्यावर उपकार करीत असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. रुग्ण दाखल असलेल्या रूममधील कचरा, रुग्णाच्या नातेवाईकांना उचलायला लावणे, रुग्णाला गरम पाणी उपलब्ध करून न देणे, लहान बाळाला झोपवण्यासाठी झोळी किंवा पाळण्याची सोय न करणे, कॉटची साईज लहान असल्याने बाळाला घेऊन झोपण्यास गैरसोय होते, कोरोनाच्या काळात एकाच रुमध्ये कमी जागेत ५ पेशंट ठेवले जातात, यामुळे तिथे जागेची कमतरता भासते. जेवणाची व्यवस्था नाही)
…. इत्यादी तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत.

 दुसरी तक्रार रामलिंग येथील रहिवासी प्रशांत साबळे यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार साबळे यांनी २० ऑगस्ट २०२० रोजी, त्यांची पत्नी माधवी साबळे यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत, माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले होते. ही योजना पूर्ण मोफत असतानाही डॉक्टर आंधळे यांनी मात्र, साबळे यांच्याकडून लॅबचे ३ हजार ९५० रु. तर मेडिसिनचे ३ हजार ६०० रु. असे मिळून ७ हजार ५५० रुपये वसूल केले होते. तसेच पाच लिटर सॅनिटायझर आणून देण्याची सक्तीही केली होती. या सर्व खर्चाच्या बिलाची पावती साबळे यांनी मागितली असता,  त्या बिलाच्या पावत्या मात्र हॉस्पिटलकडून दिल्या गेल्या नाहीत. तसेच उपचारादरम्यान बाळ व बाळाची माता यांना पोषक आहार दिला गेला नाही.

   अशाप्रकारे रुग्णांची हेळसांड होत असल्यानेच, या रुग्णालयाच्या विरोधात तक्रार केल्याची माहिती, शिरूर येथील आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे व रामलिंग महिला उन्नत्ती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगीतलेय.

 अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी, तालुक्यातील इतरही ठिकाणाहून सामाजिक कार्यकर्त्यांना व पत्रकारांनाही आलेल्या असल्याने, आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी यावर आता नेमका काय व कधी निर्णय घेतात ? याचेच औत्सुक्य आता सर्वांना लागून राहिलेले आहे.

    मात्र यातून एकच बाब समोर येत आहे, की कोरोना सारख्याही अति वाईट प्रसंगी, की ज्या वेळी सर्वसामान्यांना जीवन जगणेही कठीण होऊन बसलेय, अशा वेळीही वैद्यकीय क्षेत्रातील काही लोक जाणीवपूर्वक लोकांना आर्थिक व मानसिक त्रास देत आहेत. 

त्यामुळेच, लोकांच्या सहनशिलतेचा आता मात्र उद्रेक होत असून, ते कुठल्याही दडपणाला न घाबरता शासनदरबारी लेखी तक्रारी दाखल करत आहेत.

  (याबाबत शिरूर येथील माऊली हॉस्पिटल चे संचालक, डॉ. सतीश आंधळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी, विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी त्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तसेच, तब्बल तीन तासानंतरही त्यांचा कॉल बॅक किंवा काहीच रीप्लाय आला नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *