बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर :
दि. 27/05/2021
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती, पैलवान मंगलदास बांदल यांना, शिक्रापूर पोलिसांनी काल आर्थिक फसवणुकी प्रकरणी अटक करून, शिरूर पोलीस ठाण्यातील कोठडीत रात्रभर ठेवले होते.
आज गुरुवार दि. २७ मे २०२१ रोजी, बांदल यांना शिरूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ जून २०२१ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांच्या फिर्यादीनुसार, बांदल यांनी बनावट कागदपत्रांद्वारे बँकेचे बनावट कर्ज प्रकरण करून त्यांची फसवणूक केलेली होती. त्यामुळे, शिक्रापूर पोलिसांनी तातडीने व मोठ्या चलाखीने, पैलवान मंगलदास बांदल यांना काल बुधवार दि. २६ मे २०२१ रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथून, संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अटक केलेली होती.
मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या तीन साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल होत, शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना एकट्याला अटक करत, त्यांची वैद्यकीय चाचणी कर्डे येथील शासकीय आरोग्य उपकेंद्रात करून, शिरूरच्या पोलीस कोठडीत ठेवले होते.
या फसवणूक प्रकारणात पैलवान मंगलदास बांदल व त्यांच्या पत्नी रेखा मंगलदास बांदल यांच्यासह, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) व यांच्याव्यतिरिक्त आणखी एका अनोळखी व्यक्तीवर, शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या नावावर बोगस गहाणखत बनवून, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल १ कोटी २५ लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवून, फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्रापूर पोलिसांनी मोठ्या चलाखीने, तातडीने व गोपनीय पद्धतीने, पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती, पैलवान मंगलदास बांदल यांना काल अटक केलेली होती. ही अटक कशामुळे झाली हे न कळाल्याने, काल सर्वत्रच उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहेत.