शिरूर पोलिसांनी १६ लाख ३८ हजारांचा गांजा केला जप्त…

न्हावरा / शिरूर –
बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ एप्रिल २०२१ रोजी, गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील मौजे न्हावरा गावच्या हद्दीत, साखर कारखान्याचे बाजूस असलेल्या न्हावरा ते आलेगावपागा या गावाकडे जाणाऱ्या रोडच्या उत्तरेला, एका पालामध्ये विक्री करण्याकरीता गांजाची साठवणूक करून ठेवलेले आहे.

अशी बातमी मिळताच तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक पडवळकर, पोलीस हवालदार संतोष साठे, पोलीस नाईक मुकुंद कुडेकर, पोलीस अंमलदार इब्राहिम शेख, पोलीस अंमलदार संतोष साळुंके, पोलीस अमलदार प्रशांत खुटेमाटे व महिला पोलीस अंमलदार शितल गवळी यांच्यासह, महसूल विभागाचे  नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव व दोन शासकीय पंच, यांना शिरूर पोलिस स्टेशन येथे बोलावून घेऊन, त्यांना सदर बातमी सांगून मिळालेल्या माहिती नुसार, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी स्वतः पोलिस स्टाफ व पंच, असे एनडीपीएस एक्ट मधील छापा टाकण्यात तरतुदीचे तंतोतंत पालन करून, सरकारी वाहन क्रमांक MH 12, PT 2209, व MH 42 B 6721 मधून रवाना होऊन, रात्री ८.३० वा. चे सुमारास, मौजे न्हावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे गावचे हद्दीत, न्हावरा – आलेगावपागा रोड च्या उत्तरेला, माळरानावर असलेल्या मोकळ्या जागेत एक पाल वजा झोपडी गाडीतून दिसली. तिथे रोडच्या बाजूला वाहने उभी करून सर्वांनी त्या पालाला चारही बाजूंनी वेढा टाकून छापा टाकला असता, सदर पालामध्ये चार इसम बसलेले होते.

नायब तहसीलदार व सरकारी पंच यांच्यासह पोलिसांनी पालाची झडती घेतली असता, सदर पालामध्ये एकूण दोन गोणीमध्ये, खाकी रंगाच्या प्लास्टिक कागदात गुंडाळलेले एकूण ३५ पुडे मिळून आले. सदर पुड्यांपैकी एक पुडा पंचांसमक्ष उघडून पाहिला असता, त्यामध्ये हिरवट रंगाचा साधारण ओलसर असा उग्र वासाचा झाड पाल्यासारखा पदार्थ दिसून आला. त्यावेळी पोलीस व सरकारी पंच यांनी त्याचा वास घेऊन पाहिला असता, सदर झाड पाल्यासारखा पदार्थ हा गांजा असल्याची खात्री झाली. सदर ३५ पुड्याचे वजन करून पाहिले असता, एकूण ७८ किलो वजनाचा व १६ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा गांजा मिळून आला. सदर बाबत पोलीस अमलदार प्रशांत खुटेमाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, शिरूर पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे –
१) सुनील रुपराव पवार, वय 20 वर्ष   २) आकाश सर्जेराव पवार, वय 20 वर्ष,   ३) विशाल कैलास मोहिते, वय १८ वर्ष,   ४) प्रकाश सर्जेराव पवार, वय १८ वर्ष, सर्व राहणार टाकरखेड, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, यांनी त्यांच्या कब्जा मध्ये असलेले ७८ किलो वजनाचे ३५ पुडे, त्यांची किंमत रुपये १६ लाख ३८ हजार रुपये किमतीचा गांजा, अमली पदार्थ घाऊक व किरकोळ विक्री करण्याच्या उद्देशाने व स्वतःच्या फायद्यासाठी जवळ बाळगणे व साठवणूक केल्याच्या स्थितीत मिळून आल्याने, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क),  २०, २२  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमृत देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *