प्लाझ्मा दात्यांना पिंपरी चिंचवड महापालिका देणार दोन हजारांची प्रोत्साहनात्मक मदत – महापौर उषा उर्फ माई ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड : दि १६ एप्रिल
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सार्वजनिक रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान प्लाझ्माची मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी “प्लाझ्मा थेरपी’ कडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे. प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दात्यांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच, या प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून दोन हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे. या संदर्भात महापालिकेच्यावतीने आज दि.१६ रोजी निर्णय घेण्यात आला. तसेच सध्या खाजगी रुग्णालयांमधील रुग्णांना प्लाझ्मासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये दराने प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्याऐवजी आता महापालिकेच्या रक्तपेढीतून या रुग्णांना मोफत प्लाझ्मा पुरविण्यात येणार आहे. याचा शहरातील गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.

संसर्गाच्या भीतीने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले असून प्लाझ्मा संकलन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मादान करू शकतात. मात्र पुन्हा संसर्ग होईल या भीतीने प्लाझ्मा दात्यांची संख्या कमी झाली आहे. प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा थेरपीसाठी दाता हवा आहे असे असंख्य फोन आणि मेसेज येत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान मोहीम थंडावते. शिवाय करोना संसर्गामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फटका प्लाझ्मादानाला बसला आहे. शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आवाहन करूनही प्लाझ्मा देण्यासाठी फारसे लोक पुढे येत नसल्याने मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्ती व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी कोरोनावर मात करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *