भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह चौघांविरोधात खंडणी आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे – दि १३ मार्च २०२१
भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह तीन जणांवर खंडणी आणि फसवणूक प्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. 

मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा, ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचे सुरेंद्रन नायर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भादंवि कलम 384, 385, 406, 420, 120 (ब) 34 या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका ५४ वर्षीय महिला वकिलाने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या पुण्यात राहतात. त्यांना मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता. त्यानंतर मित्रांच्या चौकशीतून त्यांनी मंगलप्रभात लोढा यांच्या वरळीतील लोढा पार्क या इमारतीत फ्लॅट बुक केला होता. मंगलप्रभात लोढा हे ज्वाला रिअल इस्टेट लिमिटेड कंपनीत (नंतर नाव मायक्रोटेक डेव्हलपर्स झाले) चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर होते. तर अभिषेक लोढा हे सध्या या कंपनीत चेअरमन आहेत.

फिर्यादी यांनी लोढा यांच्या या स्कीममध्ये फ्लॅट बुक करण्याचे निश्चित केले. त्यानंतर कंपनीच्या वतीने सुरेंद्रन नायर फिर्यादीच्या पुण्यातील घरी आले. त्याने त्यांना फ्लॅटची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर ५ कोटी ५९ लाख २७ हजार १२७ रुपयांत या फ्लॅटचा सौदा ठरला.

त्यापैकी ३ कोटी ९२ लाख रुपये फिर्यादीने वेळोवेळी दिले, परंतु २०१३ पासून ते आजपर्यंत फिर्यादी यांना फ्लॅटचे पजेशन मिळाले नाही. याशिवाय फिर्यादी यांना वेळोवेळी त्याची रक्कम वाढवून सांगत आणखी ४ कोटी १५ लाख १५ हजार ३८६ रुपये भरा अन्यथा तुमचे अग्रीमेंट टू सेल रद्द करण्यात येईल, अशी धमकी दिली.

तुमची भरलेली रक्कम फॉरफिचरद्वारे जप्त होईल, अशी धमकीही आरोपीनी दिली असल्याचे आणि वाढीव रक्कम भरण्यासाठी आरोपींनी बळजबरी केली असून फसवणूक करून खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच वरळीतील लोढा पार्क या इमारतीतील 3901 विंग A हा फ्लॅट हडप केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांवर हा गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर अशाप्रकारे खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. चतु:शृंगी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *