जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके हे कोरोणा पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत

नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके हे कोरोणा पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. दिनांक २७ ऑगस्ट रोजी आपल्याला त्रास जाणवू लागल्यामुळे आपण कोरोना चाचणी केली असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.

याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, मी स्वतः कोरोना बाधीत झालो असलो तरीही आपल्या सेवेचे कार्य थांबणार नसून मी जेथे असेल तेथून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरूच ठेवणार आहे. मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये यासाठी माझी धडपड सुरूच राहील. पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

जुन्नर तालुक्याचे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी कोरोनाशी झुंज देत असताना वेळोवेळी नागरिकांना आवाहन देखील करीत आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी प्रशासनाला सहकार्य करावे असे आपण वेळोवेळी आवाहन केले असून सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही आमदार अतुल बेनके यांनी आवर्जून सांगितले आहे.