५० – ५५ वर्षे राज्यात काम करतोय. ही संधी जनतेनी मला दिलीय, साथ दिलीय म्हणून इथपर्यंत – शरद पवार

हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा – अजित पवार

पवारसाहेबांची तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे – जयंत पाटील

महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही -प्रफुल पटेल

व्हर्च्युअल माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री कार्यक्रमात सहभागी…

शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उत्साहात साजरा…

राष्ट्रवादीच्या नव्या वेबसाईटचे विमोचन…

रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

मुंबई दि. १२-१२-२० – मी आज ५० – ५५ वर्षे राज्यात काम करतोय. ही संधी जनतेनी मला दिलीय, साथ दिलीय म्हणून इथपर्यंत आल्याची प्रामाणिक कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

जीवनाचं सुत्र स्वीकारलं आहे त्या जीवनाच्या रस्त्यावर जाण्याचं प्रोत्साहन आपल्या मिळत असतं.
सार्वजनिक जीवनात काम करत असताना शेवटच्या माणसाच्या जपणुकीचं काम करता आलं पाहिजे. त्यातून आपण शिकत असतो असे शरद बोलताना म्हणाले.

ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा निव्वळ उल्लेख करुन चालणार नाही तर त्यांच्या विचाराच्यादृष्टीने आपण गेलं पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी तरुण पिढीला केले.

यावेळी शरद पवार यांनी महात्मा फुले यांचा मुंबईच्या गेटवे येथे पंचम जॉर्ज यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली. पंचम जॉर्ज ज्यावेळी आले त्यावेळी पोलिस पगडी बांधलेल्या इसमाला बाजुला करत होते ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांना बाजुला करुन पंजम जॉर्ज यांनी महात्मा फुले यांची भेट घेतली. त्यावेळी फुले यांच्या हातात शेतकर्‍यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे मागणी पत्र होते. शेतकऱ्यांना संकरीत बियाणांचे वाण, कास्तकरी दुधाचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडे असलेल्या समरक्ताच्या गायी त्यातून पुढे कमी दूध देणारी पिढी याची माहिती देताना शेतकर्‍यांना, कास्तकरी लोकांना संकरीत गायींचा पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर इंग्रज सरकारने विचारही केला होता. म्हणजे आधुनिक विज्ञानाचा विचार महात्मा फुले यांनी त्यावेळी केला होता तोच विचार पुढे शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. याची सविस्तर माहितीही शरद पवार यांनी दिली.

माझे एकाप्रकारचे भाग्य आहे की, स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये त्यावेळच्या गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारले. ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील आयुष्यभर निभावली. याचा लाभ म्हणून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभला असेही शरद पवार म्हणाले.

कोरोनाकाळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो. पण जयंतरावांनी एका ठिकाणी सर्व राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात नवीन पिढी काम करताना दिसली याचा आनंद आहे. हीच नवीन पिढी पुढे राज्यात काम करेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

आज सामुहिक कष्ट केले. त्या कष्टाचा सन्मान करण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्याबद्दल अंत:करणापासून शरद पवार यांनी आभार मानले.

हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा -अजित पवार

हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरणीय खासदार शरद पवार यांचे अभिष्टचिंतन केले.

आदरणीय शरद पवारसाहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय उत्कृष्ट असा व्हर्च्युअल रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष आणि फ्रंटलच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

१२ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. तो क्षण आज आपण एकत्र घालवला याचा आनंद होतोय. राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत. हे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे. शेवटी पवारसाहेबांची शिकवण आहे की, राज्यावर संकट आल्यानंतर आपण धावून गेले पाहिजे. मागच्या ५० वर्षांपासून आपण पवारसाहेबांना सामाजिक जीवनात काम करताना पाहतोय. ८० व्या वर्षीही ते त्याच ताकदीने काम करत आहेत. मला तर वाटतं, पवारसाहेबांसारखा नेता या शतकात तरी होणार नाही. पवारसाहेबांसारखे नेते आपल्याकडे आहेत, याचा मला अभिमान आहे. राज्यातील १३ कोटी जनतेच्यावतीने आणि उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

पवारसाहेबांची तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे – जयंत पाटील

शरद पवारसाहेबांची आठ दशके म्हणजे ही त्यांची तपश्चर्या आहे…त्यांची साधना आहे. हीच तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘८ दशके कृतज्ञतेची’ या विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोविड काळात आपण अनेक जिव्हाळ्याची नाती गमावली. त्यामुळे आदरणीय खासदार पवारसाहेबांनी वाढदिवस साजरा न करण्याचा विचार केला. मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब सामान्य कार्यकर्ते तसेच अनेक विभागातील प्रतिष्ठित माणसं यांच्यासाठी वाढदिवस साजरा करावा असा आग्रह आम्ही ठेवला आणि पवार साहेबांनी याला होकार दिला आणि हा कार्यक्रम पार पडत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

आज देशाच्या राजधानीच्या दारात शेतकरी बसला आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन होत करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शेतकऱ्यांसोबत होता आणि यापुढेही असेल अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.

आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आदरणीय खासदार पवारसाहेबांनी ८० वर्षाचा कालखंड अविरत लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम केलेय. पुढील ५०-१०० वर्षांनी देखील भारतातील सर्व घटकांना मदत करणारा नेता म्हणून पवारसाहेबांचे नाव घेतले जाईल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र कुणामुळे घडला यात अनेक दिग्गजांची नाव घेता येतील त्यात प्रमुख नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. पण महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींच्या यादीत महाराष्ट्राला आकार देणारे म्हणून पवारसाहेबांचे नाव घेतले तर चुकीचे ठरणार नाही. २०१९ ला झालेला चमत्कार आपण पाहिला. झालेले वार अडवण्याचे काम पवारसाहेबांनी केले. काही लोक म्हणाले की पवारसाहेबांचा राजकीय कालखंड समाप्त झाला परंतु त्यांनी बॉडीगार्ड आणि सरकारी लवाजमा सोडून महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

मागच्या निवडणुकीत अनेकांनी पक्ष सोडला. मी सगळ्यांना सांगत होतो आमच्याकडे अ गेला तर ब आहे आणि ब गेला तर क आहे आणि इतकंच नाही तर आमच्याकडे शरद पवार नावाचं विद्यापीठ आहे, हे पूर्णतः खरे ठरले आहे.

मी जलसंपदा खात्याची जबाबदारी घेताच पवारसाहेबांनी फोन करून नाशिक आणि मराठवाड्यात पाणी देण्याचे काम कसं होईल याची माहिती दे असा आदेश दिला. या कामाला आम्ही लागलोच आणि आता मी विश्वासाने सांगू शकतो की पुढील ३ वर्षात पाणी समुद्रात वाया जाणार, हे पाणी मराठवाडा भागात फिरवण्याचे काम पूर्ण होईल. त्यासोबतच वैनगंगेच्या खोऱ्यातील पाणी नळगंगेला देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी हा ‘पण’ करतो की महाराष्ट्राचे पाण्यासाठीचे हे चित्र पुढील काळात नक्कीच बदललेले दिसेल असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

पवारसाहेबांकडे पाहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना पूर्ण झाली हा विश्वास मिळतो असेही जयंत पाटील म्हणाले.

आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्युअल रॅलीमध्ये दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आयुष्यात पराभव माहीत नाही. ५५ वर्षे लोकांच्या हितासाठी सदनात काम केले आहे. ते म्हणजे पवारसाहेब. महाराष्ट्राचा आकार साहेबांमुळे घडला आहे.
काही मुख्यमंत्री परदेशात इव्हेंट करायला म्हणून जातात. परंतु पवारसाहेब त्याकाळात तरुण उद्योजकांना घेऊन अमेरिकेत गेले होते याची आठवण जयंत पाटील यांनी करुन दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा आज पवारसाहेब सांभाळत आहेत असे सांगतानाच
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही -प्रफुल पटेल

ममता बॅनर्जी यांच्यापाठीशी जसे त्यांच्या राज्यातील खासदार उभे राहू शकतात तसे पवारसाहेबांच्या पाठी राज्यातील ४८ खासदार का उभे राहू शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करतानाच तसा महाराष्ट्र आजही साहेबांच्या पाठिशी उभा आहे परंतु महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही जे स्वप्न आपण पहात आहोत ते पूर्ण करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

मला ४० वर्षे पवारसाहेबांना जवळून पाहण्याचा सौभाग्य लाभलं… मला घडवण्यामध्ये आणि मी जो काही आहे तो पवारसाहेबांमुळे अशी प्रामाणिक कबुली खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.

३० वर्षात राष्ट्रीय राजकारणात पवार साहेबांच्यासोबत आहे. मानसन्मान आज आहे तेवढाच मानसन्मान त्याकाळातही होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेव्हा जेव्हा दिल्लीला येत होते. तेव्हा फक्त आणि फक्त पवारसाहेबांकडे येत होते असे सांगताना समाजकारणात साहेबांनी कधी राजकारण केले नाही हेही खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नंतर महिलांच्यावतीने महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी साहेबांचे
औक्षण केले. कार्यक्रमाची रुपरेषा महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सांगितली.

त्यानंतर ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बीडहून सहभागी झाले होते. त्यांनी शरद पवारसाहेबांना शुभेच्छा दिल्या. माणूस सुध्दा देवमाणूस होवू शकतो हे साहेबांनी घडवून दाखवलं आहे अशा शब्दात शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी २९ लाख दिव्यांगाना ‘महाशरद’ डिजिटल फ्लॅटफॉर्मचा फायदा होणार असून या फ्लॅटफॉर्मचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नव्या वेबसाईटचेही (www.ncp.org.in) विमोचन शरद पवार यांच्या हस्ते झाले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,
गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, एकनाथ खडसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यातील एक लाख आदिवासी बांधवांना मेडिकल किट्सचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना शरद पवार यांच्या हस्ते देऊन करण्यात आले.

‘तारणहार’ या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा सोनवणे – बिश्वास यांनी पवारसाहेबांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील जनतेच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘महास्वयंम’ पोर्टलवर ८० हजारापेक्षा जास्त नोकर्‍यांची नोंदणी झाली आहे. हा मेळावा २० डिसेंबरपर्यंत सुरू ठेवणार असल्याची घोषणाही नवाब मलिक यांनी केली.
आयटीआयचा कायापालट करणारी ३० हजार कोटी रुपयांची योजना साहेबांनी दिली आहे. १ मे रोजी एक लाख रोजगार पवारसाहेब यांच्या हस्ते उपलब्ध करुन देणार आणि गिनिज बुकामध्ये नोंद करणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले. यावेळी महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

डिजिटल माध्यमातून सभासद नोंदणीचे उद्घाटन आणि डिजिटल पहिला सभासद होण्याचा मान शरद पवार यांना देण्यात आला.

राष्ट्रवादी अभिप्राय उपक्रमात चांगल्या कामगिरीबद्दल सर्व सेलच्या प्रदेशाध्यक्षांचा व जिल्हाध्यक्षांना शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

वाळूचित्रकार नितेश भारती यांनी शरद पवार यांच्या आयुष्यातील घटनांवर वाळू शिल्पातून दृष्टीक्षेप टाकला.

शॉर्टफिल्म ‘योध्दा@८०’ प्रथम क्रमांक पटकावलेल्या विजेत्या आकाश फुके यांच्या संघाला एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कॉंग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर, बिजनूरचे खासदार मलूक नागा, ऊर्मिला मातोंडकर, शिशिर शिंदे यांनी यावेळी प्रत्यक्ष भेटून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, खासदार फौजिया खान, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, एलजीबीटी सेलच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया पाटील, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *