“इच्छापूर्ती होऊनही लादलेल्या गदिमा स्मारक जनआंदोलनाचा पाठींबा आम्ही माडगूळकर कुटुंबीय काढून घेत आहोत”

रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पुणे दि १३ डिसेंम्बर गदिमांच्या साहित्याचा जागर करायला आमचा विरोध नाही मात्र जागराच्या आडून छुपे आंदोलन करण्यास आमचा विरोध आहे.

गेली अनेक वर्षे माडगूळकर कुटुंबीय गदिमांच्या स्मारकासाठी झटत आहोत,अनेक प्रयत्न करूनही स्मारक होत नसल्यामुळे प्रदीप निफाडकर यांनी पुढाकार घेतलेल्या जन आंदोलनाच्या चळवळीला आम्ही पाठींबा दिला होता.गदिमांचे स्मारक होण्यासाठी जे शक्य होईल ते करण्याची आमची तयारी होती,आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्याआधी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझा संपर्क झाला होता व त्यानीं मला ठामपणे सांगितले होते की स्मारकासाठी सर्व तयारी झाली आहे व करोना मुळे या वर्षी आम्ही काही करू शकलो नाही,तेव्हा मी त्यांना विनंती केली की तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर करावे,तेव्हा महापौरांनी आपण दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊ असे सांगितले.त्यानंतर आलेल्या आचारसंहिते मुळे महापौरांना जाहीर पत्रकार परिषद घेता आली नाही व त्यांचा माझा २० दिवस काहीही संपर्क झाला नाही,दरम्यान महापौरांकडून काही संपर्क न झाल्यामुळे आम्ही आंदोलनात ओढले गेलो व आंदोलनाला पाठींबा देण्याचा विचार आम्ही केला.आचारसंहिता संपल्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मला फोन करून पत्रकार परिषदेचे निमंत्रण दिले,पत्रकार परिषद चांगली झाली. महापौरांनी त्यात गदिमा स्मारकाविषयी असलेल्या सर्व शंका दूर केल्या व स्मारकाचा पूर्ण आराखडा गदिमांच्या प्रतिभेला साजेसा बनवण्यात आला आहे हे पाहून समाधान वाटले.

यानंतर महापौरांनी एक महिन्याच्या आत भूमिपूजन करू असा शब्द दिला. महापौरांच्या शब्दाचा आदर करून आता हे आंदोलन न करता साहित्य जागर करावा असे मी श्री.निफाडकरांना सुचवले मात्र त्यांचा एकूण कल हा आंदोलन पुढे चालू ठेवणे असाच दिसला,महापौरांनी ठाम आश्वासन देऊनही प्रशासन काहीच करत नाहीये असा दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न चालू आहे असे आमच्या लक्षात आले,गदिमांचा कोणीही स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करू नये अशी आमची भूमिका असल्यामुळे विनंती करूनही मागे घेण्यात न आलेल्या या आंदोलनाचा पाठिंबा आम्ही मागे घेत आहोत,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे व ते आमचा शब्द खाली पडू देणार नाहीत अशी खात्री वाटते,मात्र जबरदस्तीने चालू ठेवलेल्या आंदोलनाला आमचा पाठींबा असणार नाही.त्यामुळे माडगूळकर कुटुंबियांसाठी अथवा गदिमा प्रेमापोटी कोणी या आंदोलनाला पाठिंबा देत असेल तर कृपया याबाबतीत पुनर्विचार करावा अशी नम्र विनंती मी करत आहे.

येत्या १४ डिसेंबर ला होणाऱ्या आंदोलनाला आम्ही कोणीही माडगूळकर कुटुंबीय उपस्थित राहणार नाही, या निर्णयामुळे गदिमा प्रेमींना काही त्रास झाला असेल तर त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, गदिमा स्मारक मार्गी लागणे हा उद्देश महापौरांच्या पुढाकाराने पूर्ण झाला आहे त्यामुळे जागराच्या आडून छुपे आंदोलन करण्यास आमचा विरोध आहे (महापौरांनी जाहीर केल्यानंतरही सर्व माध्यमात चुकीच्या बातम्या पसरविण्याचे प्रयत्न आमच्या लक्षात आला), त्यामुळे या आंदोलनाशी आमचा कुठलाही संबंध राहणार नाही, गदिमा प्रेमी हे समजून घेतील अशी मी आशा करतो, मुलगी प्राजक्ता माडगूळकर, शीतल माडगूळकर व माडगूळकर परिवाराचा या आंदोलनास पाठिंबा नसेल असे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी आपला आवाजकडे बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *