नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) : –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदार संघातील लाभधारकांना मोफत श्रवण यंत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून दि. ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत हा कार्यक्रम सकाळी ९ ते ३ या वेळेत होणार आहे. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, ठाकरसी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे, महात्मा गांधी सेवा संघ आणि ‘जगदंब प्रतिष्ठान’ या संस्थांच्या सहकार्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभागी होऊन आपले श्रवणयंत्र बसवून घ्यावे असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारी महिन्यात शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव,खेड, शिरुर-हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे कर्ण तपासणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरातील तपासणीत पात्र ठरलेल्या ११५६ लाभार्थींना अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्राचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार असून या प्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार प्रकाश पवार, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलासराव लांडे व विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन खासदार डॉ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार विलास लांडे हे करत आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे हे मोफत श्रवणयंत्र शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे.