दिघी बोपखेल येथील भाजप चे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनाने निधन

बातमीदार : रोहित खर्गे (विभागीय संपादक)

पिंपरी-चिंचवड दि. २६ सप्टेंबर २०२०
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे आज (शनिवारी) कोरोनामुळे निधन झाले आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची महिनाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.

प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेलमधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून लक्ष्मण उंडे भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. पहिल्यांदाच ते निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मधुमेह देखील होता.