बातमीदार: रोहित खर्गे (विभागीय संपादक)
पिंपरी :२५ सप्टेंबर
पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन संदर्भातील बैठक पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार(25 सप्टेंबर) रोजी आयोजित केली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी चिंचवड शहराची कोरोना परिस्थितीची माहिती यावेळी दिली. शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यामध्ये यश येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,विभागीय आयुक्त सौरभ राव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ,पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार,जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माई ढोरे यांना कोरोनासंबंधी काय परिस्थिती आहे आणि तुम्ही कसे नियोजन केले आहे यासंबंधी विचारणा केली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहरासंबंधी माहिती देताना महापौर माई ढोरे म्हणाल्या की, महापालिकेच्या माध्यमातून कोविड १९ संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनच्या तुटवड्याकडे महापौरांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. कोविड १९ वर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरात सध्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जाते आहे. यासाठी प्रत्येक प्रभागानुसार स्वयंसेवक घरांना भेटी देत असून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
याचबरोबर गुरुवारी (२४ सप्टेंबर) जम्बो कोविड सेंटर मध्ये जाऊन रुग्णांशी व्हिडीओच्या माध्यमातून विचारपूस केली आहे. तसेच कोविड सेंटरची पाहणी केली. रुग्णांना वेळेत पाणी, चहा, नाश्ता, जेवण मिळते का इथपासून सेंटरमधील स्वच्छतेची पाहणी केली. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या ३०० रुग्ण आहेत. तर अॅटो क्लस्टर मध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये ३० रुग्ण असून ३ व्हेंटिलेटर वर असल्याची माहिती ढोरे यांनी दिली. यावेळी अजित पवारांनी कोविड सेंटरमध्ये जाताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला माई ढोरे यांना दिला.