घरफोडीस प्रतिबंध करणाऱ्या तरुणांवर चोरटयांनी केली दगडफेक
दि. २८/१२/२०२२
लोणावळा
लोणावळा : लोणावळ्यातील सह्याद्रीनगर, हुडको कॉलनी येथे सोमवारी पहाटे अज्ञात चोरटयांनी एका घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याची चाहूल शेजारील घरातील नागरिकांना याची चाहूल लागताच त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना कॉल करून करुन ही माहिती दिली. त्यामुळे परिसरातील तरुण तेथे जमा झाले. त्यांनी चोरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. चोरटयांनी बेचकीतून तरुणांवर खड्यांचा माराआणि दगडफेक करत तेथून पळ काढला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
याप्रकरणी वृषाली हनुमंत राऊत (वय 34 वर्ष, रा. पसायदान, सह्याद्री नगर हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली असून लोणावळा शहर पोलीसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.द.वि.क 457,380,511 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार तीन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील साहित्य विस्कटून घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटे घरात चोरीच्या उद्देशाने शिरत असल्याची चाहूल शेजारच्या घरातील लोकांना लागल्याने त्यांनी आजूबाजूच्या काही जणांना फोनवरून याची कल्पना दिली. त्यानंतर काही तरुण घराबाहेर येऊन ज्या घरात चोर घुसले होते तिकडे जात असतांनाच चोर घराबाहेर पडले आणि त्यांचा सामना युवकांशी झाला. यात चोरट्यांनी त्यांच्या हातात असलेल्या बेचकीतून तरुणांवर खड्यांचा मारा केल्यामुळे दोन तरुण किरकोळ जखमी झाले. दरम्यान तिन्ही चोरटे त्यांनी सोबत आणलेल्या दुचाकीवरून पोबारा करण्यात यशस्वी झाले.