तेव्हा लाठ्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसायचं असं काही नाही; सीमावादावरून उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

२६ डिसेंबर २०२२


उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.  एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही,अशी भूमिका कर्नाटक सरकारने मांडली. तशी धमक आपल्यात आहे का? आपण तशी भूमिका मांडू शकतो का? कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपला नेता मानतात. आपले मुख्यमंत्री दिल्लीत जातात. ते या विषयावर बोलणार आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मराठी भाषिकांनी कन्नड भाषिकांवर किती अन्याय केला? महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवर किती अन्याय केला? आपण कन्नड भाषिकांवर अन्याय केला नाही. पण कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर सातत्याने अत्याचार करत आहे. त्याविरोधात आपण भूमिका घेणार आहोत की नाही?तुम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. आता सीमापार गेला. आता तिकडे गेला म्हणून बोलायचं नाही असं नाही.तेव्हा लाठ्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसायचं असं काही नाही, असा चिमटा काढतानाच किती काळ मराठी माणसाने लाठ्या खायच्या? किती काळ फक्त या विषयावर चर्चा करणार आहोत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

सीमावादाच्या प्रश्नी सभागृहातील सदस्यांचं एकमत झालंय, त्याबद्दल पक्षभेद बाजूला ठेवून अभिनंदन करतो. मराठी माणसासाठी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली त्याबद्दल अभिनंदन करतो. मराठी भाषिकांनी कर्नाटकात राहून केवळ मराठीत बोलूनच आपला मनोदय व्यक्त केला. महाराष्ट्रात जायचं सांगितलं आहे. ठराव मांडले आहेत. निदर्शन केली आहेत. लोकशाही मार्गाने जे जे करायचं ते केलं आहे. पण हा प्रश्न मार्गी लागला नाही, असंही त्यांनी सांगितलं. मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देणार आहे. विरोधी पक्षात आल्यावर पेन ड्राईव्ह द्यावे लागतात, असा चिमटा त्यांनी काढला. या पेन ड्राईव्हमध्ये सत्तरीच्या दशकात महाराष्ट्र सरकारने ‘केस फॉर जस्टिस’ ही फिल्म केली होती. ती आहे. 18व्या शतकापासून कर्नाटकात लोक मराठी भाषा कसे वापरत आहेत. शाळा, कामकाज, संस्था यांचे पुरावे त्यात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *