“स्वच्छ भारत” अभियानासाठी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग बंधनकारक

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०३ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान धर्तीवर राज्यामध्ये व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वच्छ भारत अभियान राबविणेत येत आहे. सदर अभियान हे गेले काही वर्षे मनपामार्फत चालू आहे. या स्वच्छ भारत अभियानामध्ये फक्त आरोग्य विभाग हा सक्रीयपणे काम करीत असून या अभियानाचे महत्व व देशपातळीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मानांकन पहिल्या क्रमांकात येणे आवश्यक आहे, हे मनपामध्ये काम करणा-या प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. यासाठी फक्त अधिकारी किंवा आरोग्य विभाग यांनी काम करून चालणार नाही, तर वर्ग ४ कर्मचाऱ्यांपासून सर्व कर्मचारी/ अधिकारी यांनी हे अभियान समजून घेऊन त्यामध्ये सक्रीय सहभागी होणे आवश्यक आहे. यापुढे “स्वच्छ भारत” अभियानासाठी मनपा अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग बंधनकारक आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. अध‍िकारी व कर्मचारी यांच्या सक्रीय सहभागासाठी आयुक्त श्री. पाटील यांनी परिपत्रक जारी केले आहे.

अभियानाचे महत्व समजून देशपातळीवर महापालिकेच्या पहिल्या क्रमांकासाठी सक्रीय व्हा – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

स्वच्छ भारत अभियानासाठी आरोग्य विभागासोबत स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग हे सक्रीयपणे सहभागी झालेले दिसून येत आहेत. परंतु, सर्व विभागप्रमुख व त्यांच्या अधिनस्त असणारे सर्व अधिकारी / कर्मचारी यांचेपर्यंत स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश समजावणे व सदर अभियानामध्ये सर्वांचा सहभाग करून घेणे आवश्यक आहे. मनपातील कर्मचारी व त्यांच्या सोबत मानधनावरील कर्मचारी हे सर्व लोक पिंपरी चिंचवड मनपाच्या हद्दीमध्ये वास्तव्यात आहेत. त्यांनी कचऱ्याचे ओला व सुका कचऱ्याचे विघटन वैयक्तिक स्तरावर किंवा सोसायटीत राहत असल्यास सोसायटी स्तरावर ओल्या कचऱ्यासाठी कंपोस्ट प्लांट उभारणे, वैयक्तिक स्तरावर बकेट कंपोस्टिंग प्लान्ट उपलब्ध करून घेणे व घरात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे, स्वच्छ भारत अभियान आपले कुटुंब राहणारा परिसर, आपली सोसायटी यांच्यापर्यंत सोसायटी अध्यक्ष व पदाधिकारी यांचे मार्फत प्रबोधन करणे आवश्यक आहे.

कर्तव्य समजून काम करा…

मनपाचे “स्वच्छाग्रह” हे अभियान समजून घेऊन सर्व स्तरापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कामी विभागप्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व अधिकारी /कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी हे सगळे त्यांच्या वैयक्तिक स्तरावर व सोसायटी स्तरावर उपाययोजना करणेसाठी त्यांना माहिती देणे आणि प्रत्येकजण याकामी कच-याचे विघटन, परिसराची स्वच्छता, सामाजिक प्रबोधन सोसायटीमध्ये त्याचा प्रचार व प्रसार यासाठी प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांनी काय प्रयत्न केले आहेत ?, करत आहेत ? याचे प्रत्येकाचे लेखी अहवाल मागवून घेणेत यावेत. या अहवालाची नोंद गोपनीय अहवालामध्ये घेण्यात यावी, जेणे करून महानगरपालिकेचे किमान ८ ते १० हजार कर्मचारी हे स्वच्छ भारत अभियानाचे पाईक बनतील व संपूर्ण शहराला या अभियानाचे महत्व पटवून देऊन संपूर्ण शहर स्वच्छ होण्याचा निर्धार या शहरामध्ये निर्माण होईल. सर्व विभागप्रमुख यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी /कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी व इतर कर्मचारी यांना अभियान समजून सांगणे, याबाबतचे लेखी एकत्रित अहवाल आरोग्य मुख्य कार्यालय यांचेकडे जमा करणेत यावे. अशा बैठका प्रत्येक महिन्याला घेण्यात येऊन त्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे देण्यात यावा.

वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्व‍िमिंग व ट्रेकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यानी माहिती द्यावी…

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये सायक्लोथॉन, वॉकेथॉन, स्विमिंग यामध्ये शहरातील नागरिकांचा सहभाग होऊन त्या स्तरावर सुद्धा मनपाचे मानांकन ठरत असते. त्यासाठी सुद्धा विभागप्रमुख व त्यांच्या अधिनस्त जे अधिकारी / कर्मचारी नियमित वॉकिंग, रनिंग, सायकलिंग स्विमिंग व ट्रेकिंग करत असतात अशा सर्व अधिकारी व कर्मचारी यांची माहिती स्वतंत्रपणे BRTS विभागास उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून अशा लोकांचे राष्ट्रीय स्तरावर नामांकन होऊन शहराचे नामांकन वाढून हे सर्व अधिकारी/कर्मचारी यांना स्वतंत्र ओळख व शहराची ओळख होण्यास मदत होणार आहे. सदर परिपत्रकाचे सर्व संबंधितांनी अधिकारी व कर्मचारी यांनी काटेकोरपणे पालन करावे, अशा सुचना देखील आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *