सर्वेक्षणासारखी अशैक्षणिक कामे शासनाने शिक्षकांना न देता इतर संस्थांना द्यावीत…

सर्वेक्षणासारखी अशैक्षणिक कामे शासनाने शिक्षकांना न देता इतर संस्थांना द्यावीत
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : २८/०१/२०२४.
सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मराठा व इतर सर्वच जातींचे जातनिहाय सर्वेक्षण चालू आहे. त्यासाठी शासनाने शिक्षकांना या कामाला लावलेले आहे.
परंतु त्यास शिरूरच्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने आक्षेप घेण्यात आलाय. याबाबतचे निवेदन व काही मागण्या कर्डिले यांनी तहसीलदारांमार्फत शासनाला दिलेल्या आहेत.
या निवेदनात असे म्हटले आहे की, “शिक्षकांना अचानक या सर्वेक्षणासाठी काम लावल्याने ऐन परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे. तसेच सध्या विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा काळही चालू असुन, शिक्षक मात्र अचानकपणे सर्वेक्षण करण्यात गुंतलेले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, याबाबत अनेक पालकांनी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांच्याशी संपर्क साधून, मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत व्यथा व्यक्त केल्यात. हे सर्व बघता असे वाटते की, शिक्षक हे विद्यार्थांना घडविण्यासाठी आहेत ? की सर्वेक्षण, मतदानाचे काम करण्यासाठी आहेत ? असा प्रश्न पडतोय.”
त्यांनी असेही मत व्यक्त केले की, “अनेक सुशीक्षीत बेरोजगार समाजात आहेत, काही सामाजिक संस्था आहेत, की ज्यांना मानधनाची गरज आहे. त्यामुळे अशी कामे जर त्यांना दिली, तर सुशिक्षित बेरोजगारांनाही रोजगार मिळेल व त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही. त्यामुळे आपणास या निवेदनाद्वारे नम्र विनंती करते की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्वेक्षणासारखी कामे इतर यंत्रणेला देऊन सहकार्य करावे.”
अशाप्रकारचे निवेदन शिरूर तहसिलदारचे बाळासाहेब म्हस्के यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी दिले असून, निवेदन देतावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेश सरचिटणीस शोभना पाचंगे, राष्ट्रवादी काँगेसच्या युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *