संजोग वाघेरे शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीकडे रवाना; हजारो गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्तीप्रदर्शन

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे आपल्या हजारो समर्थकासंह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबईकडे मार्गस्थ झाले. त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा मातोश्रीच्या दिशेने रवाना झाला आहे. पिंपरी-चिंचवड ते मुंबईपर्यंत जागोजागी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी संजोग वाघेरे यांचे जोरदार स्वागत केले. सर्वांचा सत्कार स्वीकारत संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड ते मातोश्रीपर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आहेत. त्यांनी तीन-चार दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते आज शनिवार मुंबईत मातोश्री येथे जाऊन शिवबंधन बांधणार आहेत. त्यासाठी ते शनिवारी सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत माजी सत्तारूढ पक्षनेते तथा राज्यसंघटक एकनाथ पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, यांच्यासह शहरातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्तेही आहेत.

संजोग वाघेरे यांचा शिवसेनेतील प्रवेश भव्यदिव्य व्हावा यासाठी त्यांच्या समर्थकांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार तयारी केली होती. त्यामुळे संजोग वाघेरे हे शनिवारी सकाळी मातोश्रीकडे रवाना झाले तेव्हा त्यांच्यासोबत हजारो गाड्या घेऊन समर्थकांनीही भगव्या झेंड्यासह मुंबईकडे कूच केली आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग भगवेमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे तर घाटाखाली सुद्धा संजोग वाघेरे व त्यांच्या समर्थकांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेत प्रवेशासाठी निघालेल्या संजोग वाघेरे यांचे जागोजागी प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. संपूर्ण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर शिवसेनेच्या त्या त्या ठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी संजोग वाघेरे यांचे जंगी स्वागत केले. या सर्वांचा सत्कार स्वीकारत संजोग वाघेरे मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले. मातोश्रीवर दुपारी ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत.

संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवडमधील स्वतःचे मोठे राजकीय अस्तित्व असलेले नेते आहेत. त्यांचे वडील दिवंगत भिकू वाघेरे हे पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. स्वतः संजोगे वाघेरे हे देखील महापौर होते. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा होत्या. तसेच संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्षपदही भूषविलेले आहे. त्यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. आता ते आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. संजोग वाघेरे यांच्यासारखा तगडा उमेदवार मिळाल्याने मावळ मतदारसंघात महाविकास आघाडी महायुतीला काँटे की टक्कर देणार असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *