शिरुर नगरपरिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.

मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी शिरूर (घोडनदी) नगर परिषदेला एक निवेदन दिले असून, त्यात शिरूर शहरातील अनधिकृत बांधकामे, ‘जिओ’ कंपनीचे शहरातील रस्त्यांवरील व पदपथावरील अनधिकृत खांब, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, चतुर्थ वार्षिक श्रेणी कर आकारणीतील त्रुटी, प्रशासनाचा अनागोंदी कारभार या बाबींचा समावेश आहे.
या आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरुर नगर परिषदेला निवेदन दिलेले होते. त्या अनुषंगाने लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन, उपोषणही करण्यात आले होते.

 

परंतु नगरपरिषद जाणीवपूर्वक अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई करीत नसल्याचे निर्देशनास येत आहे. जिओ डिजीटल या कंपनीने नगरपरिषदेने
दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करून, परवानगी नसलेल्या रस्त्यावर बेकायदेशीर खांब उभे केलेले आहेत. तरी देखील नगरपरिषद याबाबीकडे डोळेझाक करीत आहे. शहरातील रस्त्यांवर दुतर्फा दुकानांसमोर दोनचाकी, चारचाकी वाहने पार्क केली जातात. अशा परिस्थतीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना, वृद्धांना, महिलांनां, नागरिकांना रस्त्याच्या मिळेल त्या भागातून म्हणजे काहीवेळा रस्त्याच्या मध्यभागातून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागतेय. त्यामुळे अनेकवेळा अपघातसुद्धा झालेले आहेत. कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य जनता सावरलेली नसतानाच, चतुर्थ वार्षिक श्रेणी कराचे भूत शिरुरकरांवर लादण्यासाठी जोरदार प्रयत्न चालु आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्षच चालू आहे. निविदा प्रक्रिया न राबविता, बेकायदेशीररित्या मुदतवाढ देण्यात येत आहे. प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देत नाही, त्यामुळेच सोमवार दि. ०४/०९/२०२३ रोजी, शिरुर नगरपरिषदेला ‘टाळे ठोकणे’ आंदोलन करणार असल्याचे, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *