बंद सदनिकेच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून अज्ञात इसमाने पाऊण लाख रुपये ऐवजाची केली चोरी

नारायणगाव

किरण वाजगे, कार्यकारी संपादक


नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील नारायणगाव, वारूळवाडी सह मांजरवाडी, आर्वी तसेच इतर गावातील बंद घरामध्ये तसेच दुकानांमध्ये चोऱ्या करून लाखो रुपयांचा ऐवज चोरण्याच्या घटना गेल्या दोन ते तीन महिन्यात सातत्याने वाढत असतानाच आज नारायणगाव येथील बागलोहरे गावठाण येथील हनुमान मंदिराजवळील कावेरी इमारतीत पुन्हा बंद सदनिकेचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाऊण लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम पळवून नेल्याची घटना घडली आहे.
ही घटना १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याची माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या घटनेची फिर्याद उर्मिला गोकुळ गाडेकर (वय २७, राहणार नारायणगाव) यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली. त्यानुसार १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच चार हजार रुपयांचे चांदीचे दागिने व पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे पाऊण लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
दरम्यान नारायणगाव पोलीस स्थानकामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने होणाऱ्या चोऱ्या व भुरट्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अंकित गोयल तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असताना देखील जुन्नर तालुक्यात नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मात्र चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *