भारत बायोटेकच्या ‘इंट्रानेझल कोविड’ लसीच्या वापरास मंजुरी
२४ डिसेंबर २०२२
जगभरात करोनाचा प्रभाव वाढत असताना लशीची वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. याला चालना देण्यासाठी नाकावाटे देण्यात येणाऱ्या पहिल्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे. ‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेझल कोविड’ लशीच्या वापरास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली असून कोणत्याही लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना वर्धक मात्रा म्हणून ही लस घेता येणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत बायोटेकने तयार केलेल्या ‘इन्कोव्हॅक’ किंवा ‘बीबीव्ही १५४’ लसीच्या वापरास मंजुरी देण्यात आली आहे. ‘को-विन’ संकेतस्थळ आणि अॅप्लिकेशनवर शुक्रवार संध्याकाळपासून या वर्धक मात्रेसाठी नोंदणी करता येणार आहे. ही लस सुईचा वापर न करता नाकातून देण्यात येईल. ‘कोव्हिशील्ड’ किंवा ‘कोवॅक्सिन’च्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींना अधिक दक्षता म्हणून ही लस घेता येणार आहे.