कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्याहस्ते बाजरी तृणधान्यनिर्मित विविध पाककृती स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्धाटन

पुणे : मध्यवर्ती इमारत येथे बाजरी या तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या विविध पाककृतींची स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्धाटन राज्याचे  कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील, फलोत्पादन संचालक कैलास मोते, आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, मृदसंधारण संचालक रवींद्र भोसले, कृषि प्रकिया संचालक सुभाष नागरे, गुणवत्ता नियंत्रण संचालक दिलीप झेंडे, विस्तार व प्रशिक्षण सहसंचालक सुनील बोरकर, स्मार्टचे प्रकल्प व्यवस्थापक ज्ञानेश्वर बोटे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर आदी उपस्थित होते.

यावेळी कृषि आयुक्त श्री. चव्हाण म्हणाले, पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच  तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने ‘मकर संक्रांती भोगी’ हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून घोषित केला आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने १ जानेवारी २०२३ रोजी सिल्लोड कृषि महोत्सवाचे आयोजन केले. तृणधान्याचे आहारातील महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी कृषि विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वातारणीय बदल, आहारात बदल झाल्याने नागरिकांना कर्करोग, मधुमेह, श्वसनाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून  नागरिकांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पारपांरिक शेतीकडे वळण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करता राज्यातील नागरिकांनी तृणधान्य दिवस साजरा करण्याचे आवाहन कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी केले.

प्रदर्शनात  एकूण १५  स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये बाजरी या तृणधान्यापासून बनविण्यात आलेले लाडू, हलवा, बर्फी, वडी, थालिपीठ, शिरा, उपमा, उसळ, पोहे, चिवडा, चकली, धपाटे असे सुमारे ७५ प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले होते.

यावेळी कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी येथील सर्व स्टॉल भेटी देऊन पाककृतीविषयी माहिती घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *