बार मध्ये घुसून मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील “कोयता गॅंग” च्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०२ जुलै २०२२

नारायणगाव


घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशन हद्दीमधील डिंभे येथील एका बियर बारवर मागील वर्षी दरोडा टाकून दहशत वाजवणाऱ्या कोयता गँगच्या म्होरक्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. बाप्पू तुकाराम जाधव रा. डिंभे ता. आंबेगाव जि. पुणे यांनी दि.२१/३/२०२१ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार संध्याकाळी पाच वाजता हॉटेल सागर बार,डिंभे खुर्द येथे बाबू गेंगजे व गोट्या उर्फ गफऱ्या उर्फ अशोक मदगे तसेच त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांनी बार मध्ये घुसून उधार दारू दे नाहीतर पैसे दे असे म्हणून हॉटेल च्या काउंटर मधील पैसे काढून घेऊन हॉटेल मध्ये तोडफोड केली व हॉटेल मध्ये पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयन्त केला अशा आशयाची फिर्याद दिली होती.

सोशल मीडियावर गँग करू पाहणाऱ्यांवर पोलिसांची असणार नजर

या गुन्ह्यातील आरोपी बाबू गेंगजे व अशोक मदगे हे डिंभे परिसरात कोयता गॅंग नावाची गॅंग चालवत होते व दहशत पसरवत होते. हा गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी हे फरार झाले होते. त्यांना शोधून लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पो. हवालदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, संबंधित गुन्ह्यातील आरोपी अशोक मदगे हा कोरेगाव भीमा येथे पेंटींग चे काम करत असून तो कोरेगाव भीमा येथील चौकात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक मदगे यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवून नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ गोट्या उर्फ गफऱ्या रखमा मदगे रा. गोहे बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे असे सांगितले. त्याच्याकडे डिंभे येथील बारमध्ये केलेल्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी घोडेगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.दरम्यान या आरोपीवर यापूर्वी २०१७ मध्ये घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पो.उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पो. हवालदार दिपक साबळे राजू मोमीन, विक्रम तापकीर, पो. कर्मचारी संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *