कोल्हापुरातील शहीद जवान ऋषिकेश जोंधळेंच्या भगिनीचे स्वप्न सत्यात उतरले !

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०६ जून २०२२

पिंपरी


कोल्हापूर येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला दिलेला शब्द अखेर आमदार महेश लांडगे यांनी पूर्ण केला. वीर भगिनी कल्याणी जोंधळे हिच्या घराचे काम पूर्ण झाले. तसेच, तिच्या शिक्षणासाठीही धनादेश सूपुर्द करण्यात आला.

आमदार महेश लांडगे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला

शहीद ऋषिकेश यांच्या मातोश्री कविता जोंधळे व बहीण कल्याणी जोंधळे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सौभाग्यवती अरुंधती महाडीक, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उप महाराष्ट्र केसरी राजाराम मगदूम, कामगार नेते रोहिदास गाडे, खंडू भालेकर, देवराम जाधव,राजू बोत्रे, बाळासाहेब गाडे, अनिल लोंढे, सतिश गावडे, सागर हिंगणे, माजी सैनिक नवनाथ मु-हे, प्रमोद सस्ते आदी उपस्ति होते.

कल्याणी जोंधळे हिला घर अन् शिक्षणासाठी धनादेश सुपूर्द

कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथील  ऋषिकेश जोंधळे  वयाच्या २० व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाला. मात्र, अवघ्या दोन वर्षांत त्यांना दि. २१ नोव्हेंबर २०२० रोजी वीरमरण आले. जोंधळे कुटुंबाचा आधार असलेला मुलगा देशसेवेसाठी धारातीर्थी पडला. दरम्यान, सामाजिक बांधिलकीतून आमदार महेश लांडगे यांनी कोल्हापूरला रवाना होत शहीद जोंधळे यांची बहीण कल्याणी हिच्याकडून राखी बांधून घेतली. भाऊ- बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आमदार लांडगे यांनी कल्याणीसोबत साजरा केला. त्यावेळी शहीद ऋषिकेश आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नातील घर उभारण्यासाठी मदत करणार आणि कल्याणी हिच्या शिक्षणासाठी व पुढील आयुष्यात कोणत्याही अडचणीत पाठिशी उभा राहण्याचा शब्द आमदार लांडगे यांनी दिला होता.

आमदार महेश लांडगे यांचा आदर्श…

दरम्यान, शहीद ऋषिकेश यांच्या कुटुंबियांनी घराचे काम पूर्ण केले. या घराच्या वास्तुशांतीसाठी आमदार लांडगे कोल्हापूरला रवाना झाले. शहीद ऋषिकेश यांच्या मातोश्री कविता जोंधळे यांची भेट घेतली. घरासाठी लागलेल्या खर्चाचा धनादेश कल्याणी जोंधळे हिच्या हाती सुपूर्द केला. गतवर्षी,  कल्याणी हिला दुचाकी आणि लॅपटॉपही रक्षाबंधन निमित्त भेट दिली होती. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांची बहीण कल्याणी जोंधळे ही इंटेरिअर डिझाईन शाखेची विद्यार्थीनी आहे. पुढील शिक्षणासाठीही सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे. दिलेला शब्द पूर्ण करीत आमदार लांडगे यांनी आदर्श निर्माण केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *