मत्स्यालय उभारणी म्हणजे भोसरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : महापौर माई ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ मार्च २०२२

पिंपरी


२०१७ च्या निवडणूकीत दिलेल्या जाहिरनाम्यातील सर्व कामे पुर्ण केल्याचे समाधान : ॲड. नितीन लांडगे

भोसरीत उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय हे पिंपरी चिंचवड शहराच्या नाव लौकिकात भर घालणारे आहे. तसेच कुस्ती प्रशिक्षण केंद्राप्रमाणेच भोसरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. आता मत्स्यालय पाहण्यासाठी पर्यटकांना परदेशात जाण्याची गरज भासणार नाही असेही महापौर ढोरे म्हणाल्या. भोसरी येथिल सहल केंद्राच्या मागे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय (फिश अ‍ॅक्वारियम) उभारण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. १३ मार्च) महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पुर्वी पुणे – नाशिक महामार्गावर लांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कमानीचे लोकार्पण, संत ज्ञानेश्वर भाजी मंडई आणि व्यापारी संकुलाचे उद्‌घाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक संतोष लोंढे, आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पुजा लांडगे, नगरसेविका भिमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, माजी नगरसेविका शुभांगी लोंढे आदींसह भोसरीतील नागरिक उपस्थित होते.

तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते भोसरी ते घोडेगाव या बसचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक संतोष लोंढे, राजेश लांडगे, नगरसेविका भिमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, माजी नगरसेविका शुभांगी लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश सोपान लांडगे तसेच पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचारी आदींसह भोसरीतील नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक करताना स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले की, २०१७ च्या निवडणूकीत दिलेल्या जाहिरनाम्यातील सर्व कामे मागील पाच वर्षात भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करु शकलो यामुळे नागरिकांना उत्तम सेवा सुविधा मिळणार आहेत. भोसरीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा नुकताच माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला आहे. नविन भोसरी रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरु झाले आहे. येथे वैद्यकीय ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. आज भोसरी सर्व्हे क्र. १ येथे दहा ते बारा हजार स्वेअर फुट जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदिस्त मत्स्यालयाचे भुमिपूजन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते होत असताना सर्व भोसरीतील नागरिक आनंदी आहेत. या मत्स्यालयात शालेय विद्यार्थ्यांबरोबरच हजारो पर्यटक रोज भेट देतील. त्यामुळे पर्यटन व्यवसायास चालना मिळेल आणि अनेक नविन रोजगार निर्माण होतील.

भोसरी येथून शिवनेरी, पाबळ, मंचर या बस सुविधा यापुर्वीच सुरु झाल्या असून रविवारपासून भोसरी ते घोडेगाव या मार्गावर पीएमपीची सेवा सुरु करण्यात येत आहे. यामुळे भोसरी पासून सुमारे ५० किलोमिटर परिघातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांना याचा उपयोग होईल. आगामी काळात होणा-या बैलगाडा शैर्यतीसाठी भोसरीतील बैलगाडा घाटाचे काम देखिल लवकरच पुर्ण होईल. भोसरी गावठाणातील अंतर्गत रस्ते सिमेंटचे करण्याचे काम देखिल वेगाने सुरु आहे. बापूजी बुवा चौकातील शाळेच्या नविन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. भोसरी व दिघी परिसरातील नागरिकांना वारंवार वीज समस्याचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामागे महावितरण कंपनीचे स्विचिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. तसेच कै. बाळासाहेब लांडगे जलतरण तलावाचे नुतणीकरण, एसटिपी प्रकल्प, भोसरी गावातील जुने भोसरी रुग्णालयाच्या ठिकाणी २७५ बेडचे माता बाल संगोपन केंद्र, कुस्ती प्रशिक्षण केंद्रा शेजारील जागेत खुले स्टेडियम तसेच लांडेवाडी दत्त मंदिर जवळ खुली व्यायाम शाळा उभारण्याचे काम देखिल प्रगतीपथावर आहे अशीहि माहिती ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *