एस टी बसस्टँड च्या BOT अंतर्गत चालू असलेल्या नाल्यावरील अतिक्रमण विरोधातील, मनसेच्या मेहबूब सय्यद यांचे बेमुदत उपोषण जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयापर्यंत स्थगित

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१२ फेब्रुवारी २०२२

शिरूर


अतिक्रमण करून बेकायदा उभारलेल्या भिंतीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, हे शिरूर नगर परिषदेच्या नूतन इमारतीसमोर गेली दोन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले होते. या उपोषणाचे कारण म्हणजे शिरूर शहरातील एस टी स्टँड व एस टी बस डेपो च्या चाललेल्या BOT तत्त्वावरील बांधकामात नैसर्गिक ओढ्यावर केलेल्या अतिक्रमणाबाबत व त्यावर बांधकाम चालू असलेल्या संरक्षण भिंतीबाबत. उपोषणाआधी मेहबूब सय्यद यांनी शिरूर नगर परिषद व प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला होता. परंतु त्यास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेवटी या सर्व प्रक्रियेविरुद्ध उपोषण करण्याचे ठरवून, दोन दिवसांपूर्वी ते बेमुदत उपोषणाला बसलेले होते.

या विषयासंदर्भात उपोषणकर्ते मेहबूब सय्यद यांनी दिलेली माहिती अशी की  “शिरुर शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या बसस्थानकालगत असलेली जागा (४९.१० आर), ही सन २०१५ रोजी शिरूर नगर परिषदेने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून शासकीय जमीन १ कोटी ८९ लाख १७ हजार ३६० रु. ला व्यापारी संकुल (टपरी पुनर्वसन) उभारण्यासाठी कब्जे हक्काने रु १०० च्या स्टॅम्प पेपरवर ताबा पावती, जागेचा नकाशा व पंचनामा करुन विकत घेतली असून ती सन २०१५ सालापासून शिरूर नगर परीषदेच्या ताब्यात आहे. परंतु सन २०२१ मध्ये विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पुणे यांनी शिरूर नगरपरीषदेच्या स्वमालकीच्या जागेवर परवानगी न घेता, नैसर्गिक ओढा (नाला) यामध्ये भिंत उभारलेली आहे.वास्तविक पाहता भिंतीच्या कामाच्या सुरुवातीलाच मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन अनधिकृत भिंतीबाबत अवगत करण्यात आले होते. तसेच भिंतीचे काम थांबविण्यास सांगितले होते. परंतु मुख्याधिकारी यांनी जाणूनबुजून डोळेझाक केल्यामुळे विभाग नियंत्रक यांनी रात्रंदिवस एक करून भिंत पूर्णत्वास नेली. विभाग नियंत्रक यांना साधी नोटीसही काढण्याची तसदी मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद यांनी घेतली नाही. याचाच अर्थ नागरिकांच्या कररुपी पैशातून विकत घेतलेली जमीन, ही एसटी महामंडळाच्या घशात घालण्याचे काम सत्ताधारी व प्रशासन संगनमताने करीत आहे” – मेहबूब सय्यद.

वरील प्रमाणेची हकीकत, उपोषणकर्ते व मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी पत्रकारांना यावेळी दिली.या उपोषणादरम्यान जनता दल (से.) चे पुणे जील्हाध्यक्ष संजय बारवकर, भाजपा उद्योग आघाडीचे जील्हाध्यक्ष संजय पाचंगे, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष फिरोज सय्यद, शिवशंभू जिजाऊ सेनेचे तालुकाध्यक्ष नाथा पाचर्णे, सामाजिक कार्यकर्ते अजय कोठारी, भाजपचे विजय नर्के, युन्नूस सय्यद, प्रदीप कर्डे, अनिल डांगे यांनी प्रत्यक्ष भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता.

शिरूर नगर परीषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावाच्या अनुषंगाने, मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्ते मेहबूब सय्यद यांना पत्र दिले की, “विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, पुणे यांना जागेच्या मालकी हक्काबाबत जिल्हाधिकारी यांचा अंतिम निर्णय होईपर्यंत, सुरक्षा भिंतीचे काम थांबविण्याचा सूचनावजा आदेश देण्यात आला आहे.”

शिरूर नगर परीषदेचे वरील पत्र घेऊन मेहबूब सय्यद यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन, लिंबू पाणी पिऊन आमरण उपोषण थांबविले.शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्या हातून मेहबूब सय्यद यांनी लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडल्याचे जाहीर केले. यावेळी नगर रचना विभागाचे निखिल कांचन, गोपनीय पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, चव्हाण, जनता दल (से.) चे पुणे जील्हाध्यक्ष संजय बारवकर, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, डॉ. वैशाली साखरे, शारदा भुजबळ, तारा आक्का पठारे, ॲड. स्वप्निल माळवे, ॲड. आदित्य मैड, संदीप कडेकर, अनिल डांगे, रवि लेंडे, अविनाश घोगरे, रवि गुळादे, बंडू दुधाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *