भोसरी मतदार संघाच्या राजकीय आखाड्यात कोण असणार ” दबंग ” लांडे, लांडगे यांच्या वर्चस्वाची लढाई सुरू…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी – दि १४ ऑगस्ट २०२१
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाचे असंख्य नगरसेवक नगरसेविका नाराज असल्याचे खाजगीत बोलले जाते. नुकताच नगरसेवक संजय नेवाळे यांचा वाढदिवस झाला तर युवा नगरसेवक रवी लांडगे यांचा वाढदिवस आहे यांच्या शुभेच्छा फलकावर ना तर कमळ दिसले ना भजपाच्या नेत्यांचे फोटो. रवि लांडगे यांच्या फ्लेक्स वर तर चक्क राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो झळकले म्हणजे ही वादळानंतरची शांतता असल्याचे बोलले जाते. नगरसेवक संजय नेवाळे यांना पाच वर्षात कोणतेच महत्वाचे पद मिळाले नसल्याने त्यांनी न बोलता आपला राग वाढदिवसाच्या फलकावर वेक्त केला असल्याचे बोलले जाते. त्यातच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप नेत्यांपेक्षा राष्ट्रवादी चे नेतेच जास्त होते. तर रवि लांडगे यांच्या बहुचर्चित फ्लेक्सवर राष्ट्रवादी भोसरी युवा नेते अमित लांडगे व पार्थ पवार यांचे फोटो झळकले. याविषयी लांडगे यांना विचारले असता येणारा काळच आणि वेळच सांगेल काय होणार ते आणि आम्हांला कुठे जायचे याबाबत रस्ते खुले आहेत. रवि लांडगे यांना स्थायी सभापती पद न दिल्याने कमालीचे नाराज होते त्यावेळीच खरे तर ठिणगी पडली होती . आता फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहोत असे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवते. तसेच आम्हीही लांडगे आहोत असे खोचक विधानही केले. आता तरी उपमहापौर पदी वर्णी न लागलेले भाजपचे वसंत बोराटे शांत असले तरी योग्य वेळ आलेवर तेही काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही.
या सगळ्या गोष्टींचा फायदा जर राजकारणातील मुरलेले पहिलवान भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी घेतला नाही तर राजकारणात एव्हडे वर्ष घालून काय मिळवले असेच जाणकारांना वाटेल. त्यामुळेच संजय नेवाळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नेमकी वेळ साधत त्यांना राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांसह भाजपावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारे नगरसेवक रवी लांडगे उपस्थित असतानाच बरोबर त्याच वेळी हजेरी लावली व वातावरण राष्ट्रवादीमय करून टाकले. आणि तेथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक भीमा बोबडे यांना देखील कळपात सामील करून घेऊन फोटो सेशन केले. तेथे उपस्थित असलेले भाजपाचे नगरसेवक मिष्किलपणे स्मितहास्य करत सर्व प्रकार पहात होते. नाराजांना एकत्र कसे करायचे व त्यांची मोट कशी बांधायची हे राजकारणाच्या आखाड्यात मुरलेले पहिलवान विलास लांडे यांचा हा करिष्मा कित्येकदा भोसरी करांनी पहिला आहे कोणत्या वेळेला कोणती वेळ व टायमिंग साधायचे ही कला त्यांच्या नसानसात भिनली आहे. त्यांच्या याच राजकीय खेळीने बरेच काही सांगून दिले. ही तर सुरवात आहे आगे आगे देखो होता है क्या असे म्हणत लांडे यांनी भोसरी मतदार संघात सुरुंग पेरायला सुरवात केली आहे.
लांडे यांनी येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीसाठी बेरजेचे राजकारण सुरू केले असून नुकतीच एका खाजगी हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये सर्वा बरोबर सविस्तर चर्चा झाली त्यातून असाच सूर आला की राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री व या पालिकेवर ज्यांचे सर्वात जास्त प्रेम आहे असे अजित पवार येथील सत्ता आणि लोकसभेला झालेला पार्थ पवार यांचा पराजय व विलास लांडे यांनी पक्षाचे तिकीट न घेता कात्रीत पकडून राष्ट्रवादी चा पाठिंबा मिळवला या गोष्टी जिव्हारी लागल्या त्यामुळे अजित पवार पिंपरी चिंचवड च्या नेत्यांवर अजूनही नाराजगी वेक्त करत आहेत. असे व ती वस्तुस्थितीही आहे त्यामुळे नक्की कोणती भूमिका घ्यावी याचा पेच सर्वानाच पडला आहे. अजित पवार यांची नाराजगी काढण्यासाठी काहीतरी मोठा राजकीय भूकंप घडवण्याचा प्रयत्न विलास लांडे आणि मंडळींचा आहे जेणेकरून दादा सगळे झाले गेलं विसरून पदरात घेऊन परत आम्हांला नव्या जोमाने लढण्याची ताकद देतील. आणि सर्व पहिल्यासारखे होईल.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर पक्षाने पद वाटपात अनेकांना डावलले. निष्ठावंत म्हणून नेत्यासाठी जीवाचे राण करणा-या असंख्य नगरसेवकांना पक्षाकडून संधी दिली गेली नाही. त्यामुळे भाजपाच्या विरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. भोसरी मतदार संघातील भाजपाचे नगरसेवक आता पर्याय शोधू लागले आहेत. हे वातावरण तयार होण्यास स्थानिक पदाधिकारी व नेते जबाबदार आहेत. भोसरीचे आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी अनेकांना पदे दिली. ज्या महापौर पदासाठी महेश लांडगे यांना अतिशय संघर्ष करावा लागला होता व ते मिळाले नाही याची सल मनात होती आणि त्यानंतर पेटून उठून जो संघर्ष केला आणि पालिकेत एकहाती सत्ताही आणली . महेश लांडगे यांनी ती महापौर पद न मिळाल्याची सल भरून काढून या शहराला आपल्या मर्जितले नितीन अप्पा काळजे आणि राहुल जाधव हे दोन तरुण महापौर करून भोसरीच्या राजकीय आखाड्यात आपणच ” दबंग ” असल्याचा इशारा दिला . परंतू पुढे पदे देताना सगळ्यांनाच खुश ठेवता येत नसते, त्यांच्याकडूनही अनेकांना डावलल्यामुळे त्यांच्यावर नाराजी ओढवून घेण्याची वेळ आली आहे. बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांना स्थायी समिती सभापती पद नाकारले. त्यामुळे त्यांनी भोसरी मध्ये फ्लेक्सबाजी करत पद नाकारल्याचा जाहीरपणे जाब विचारला. मोशीतील वसंत बोराटे यांचे उपमहापौर पद ऐनवेळी केशव घोळवे यांना पक्षश्रेष्टीकडून देण्यात आले. त्यामुळे वसंत बोराटे यांची उपमहापौर पदावर संधी हुकली व दिलेला शब्द पळता आला नाही. चिखलीच्या नगरसेविका अश्विनी जाधव आणि मोशीतील नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांना देखील गेल्या साडेचार वर्षात पदापासून दूर ठेवण्यात आले. भोसरीतील नगरसेविका प्रियांका बारसे यांनी पक्षाविरोधातच अनोखे आंदोलने केले होते त्या सुध्दा नाराजी व्यक्त करताना दिसतात. मी माझ्या स्व-कर्तृत्वामुळे असून कोणत्याही पक्षामुळे मी नगरसेविका झालेली नाही, असे त्या वेळोवेळी सांगत असतात.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या कमालीचे बिझी असल्याने या शहराकडे त्यांचे लक्ष नाही असे म्हणता येणार नाही कारण जसे राज्यात कसेही करून आघाडी सरकार आणले त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही दादांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ती घेण्यासाठी ते काहीही करतील मग योग्य वेळ आली तर या दोन आमदारांपैकीच एक आपल्याकडे घेऊन त्याच्या माध्यमातून सत्ता काबीज करतात की आहे त्याच पक्षातील नेत्यांची मोट बांधून युवा नेते पार्थ पवार यांच्याकडे शहराची सूत्रे देतात की खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडे सूत्रे देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करत येथील सत्ता काबीज करतात की वेगळीच राजनीती आखत सत्ता सूत्रे स्वतःच्या हातात ठेवतात याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. भाजपचे जहाज डुबवण्याचे सामर्थ्य एकट्या अजित पवार यांच्या झंझावातात नक्कीच आहे पण त्यांना ज्या पद्धतीने विरोधकांवर राजकीय हल्लाबोल व्हायला पाहिजे तेव्हडा होताना दिसत नाही कारण येथील प्रत्येकजण आपापले हित जोपासण्यात मग्न आहे. आपला आवाज ने या अगोदरही बातमी केली होती की या पालिकते विरोधकांची भूमीका पत्रकारच निभावताना दिसत आहेत. खरे पाहता राष्ट्रवादीकडे हल्लाबोल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार . सत्ताधार्यांनी दिलेली वचने पूर्ण केली नाही, दिवसाआड पाणी पुरवठा हा शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या बाबी व येत्या काळात भाजपातील नाराजी यांच्या जोरावर मोठी संधी राष्ट्रवादी कडे आहे या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न थोडे फार प्रमाणात करताना विलास लांडे दिसत आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या नाराज गटाची मोट बांधण्यात थोडे तरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. नजीकच्या काळात आमदार महेश लांडगे यांना आपल्या पक्षातील नाराज नगरसेवकांची मनधरणी करावी लागेल त्यात ते किती यशस्वी होतात का हे येणारा काळच सांगेल .राजकारणात काहीही होऊ शकते नाराज नगरसेवकांचा राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात प्रवेश होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकद दिली तर राजकारणात मुरलेले लांडे राजकीय आखाड्यात एक एक डाव टाकत भाजपचे बरेच मासे आपल्या गळाला लावतील का हे येणारा काळ सांगेल.
सध्यातरी सत्ताधार्यांना आपले नाराज नगरसेवकांची मनधरणी करणे कितपत शक्य होईल हे सांगता येत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर लांडे यांच्या माध्यमातून अजित पवार राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यात यशस्वी होतात की आमदार महेश लांडगे आपल्या नगरसेवकांची नाराजी दूर करत ” सत्ता ” आपल्याच हाती ठेवत आपणच भोसरीच्या राजकीय आखड्यातले ” हिंद केसरी ” आहोत हे येणा-या काळात पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *