पै. मंगलदास बांदल यांच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल : शिवाजीराव भोसले बँकेच्या अधिकाऱ्यासह आणखी काही बड्या नावांचा समावेश..

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 31/07/2021

 पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध, आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. बांदल यांनी एका शेतकर्‍याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले व परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
 याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मंगलदास बांदलसह, पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी, अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.   
  याप्रकरणी वढू खुर्द, ता. हवेली, जी. पुणे येथील गंगाराम सावळा मासाळकर (वय 74) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार वढु खुर्द येथे 2013 मध्ये व त्यानंतर वेळोवेळी घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. येथील गट क्र. १५३/१ मध्ये फिर्यादी यांची ३ हेक्टर ७१ आर जमीन आहे.

 मंगलदास बांदल यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पहिला गुन्हा दाखल झालेला होता, तो म्हणजे  पाणीचोरीचा व शेतीचे नुकसान केल्यासंदर्भातील एका निवृत्त व्यक्तीने दिलेल्या तक्रारीचा. त्या गुन्ह्यात पुणे सत्र न्यायालयाने बांदल यांना अंतरीम जामीन दिलेला होता. या संदर्भातील जामिनाचे न्यायालयाचे आदेशपत्र, शिक्रापूर पोलिसांना सादर करण्यासाठी मंगलदास बांदल हे २६ मे २०२१ रोजी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गेलेले होते. त्यावेळी दत्तात्रेय मांढरे यांच्या फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात बांदल यांना लगेचच अटक करण्यात आली होती. त्यानंतर बांदल यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल झाल्याने, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. सध्या मंगलदास बांदल हे कोठडीत असून, पुन्हा त्यांच्यावर मासाळकर यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने, त्यांच्या अडचणीत आणखीनच अडचण निर्माण झाल्याचे दिसते आहे. या गोष्टीमुळे आता मात्र संपूर्ण शिरूर तालुक्यात व पुणे पुणे जिल्ह्यात एकाच चर्चेला उधाण आलेय, ते म्हणजे आता मंगलदास बांदल यांच्यासोबत आणखी कुणाकुणाचे नंबर पुढे लागणार आहेत याचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *