वार : सोमवार
दि. १० मे २०२१
ठिकाण : तळेरान
बातमी प्रतिनिधी : लक्ष्मण दातखिळे
जुन्नर तालुक्याचा पश्चिम भाग हा आदिवासी बहुल भाग आहे. याच भागातील तळेरान येथील पाचके वस्ती आजही रस्त्यासाठी दुर्मुखलेली आहे. आज या वस्ती मध्ये साधारण १५० ते २०० लोकसंख्या असलेली वाडी असून या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव राहत आहेत. या ठिकाणाहून शाळकरी मुले, कष्टकरी शेतकरी बांधव, आबाल वृद्ध व्यक्ती यांना जाण्या येण्यासाठी तसेच शेतमालाची ने आण करण्यासाठी आवश्यक रस्ता उपलब्ध नाही. त्या मुळे येथील स्थानिक रहिवाशी असणाऱ्या जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.
तळेरान च्या मुख्य रस्त्यापासून पाचके वस्ती साधारण ०३ किलोमीटर लांब आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून दैनंदिन कामासाठी ये – जा कराव्या लागणारे नागरिक घामाच्या धारांनी न्हाऊन निघत आहेत. ये – जा करण्यासाठी रानावनातील ओबडधोबड कच्ची पाऊलवाट आणि वरतून आग ओकणारा सूर्य यामुळे हा प्रवास असह्य झाला आहे.
या भागातील जिल्हा परिषद सदस्य, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार अतुल बेनके व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या समेसेचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पाचके येथील ह्या पक्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी आशा व मागणी नागरिकांकडून केली जात आहे. येथील विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्या येण्यासाठी आपल्या पालकांप्रमानेच या आशेच्या वाटेवर खडतर प्रवास करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या कडेवर आणि पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचा हा प्रश्न मार्गी लागला नाही तर येथील नागरिकांना पाणी पावसातून खडतर प्रवासाला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोवीड-१९ संसर्गाने सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. राज्यातल्या जवळजवळ सर्वच भागात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. याला जुन्नर देखील अपवाद नाही. पाचके वस्तीवर जर अशीच काही परस्थिती उद्भवली तर वैद्यकीय सेवा कशी देणार ? हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
जर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर स्थानिक रहिवाशी नागरिकांच्या सोबत सरकार विरुद्ध व लोकप्रतिनिधींविरूद्ध आंदोलन केले जाईल असा इशारा शंतनु काका जोशी यांनी दिला आहे.