नारायणगाव येथील ग्रामवैभव इमारतीच्या परिसरात अनधिकृतपणे उभारली टपरी…ग्रामवैभव इमारतीमधील गाळा धारकांचा आरोप

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायतच्या अखत्यारीत असलेल्या ग्रामवैभव इमारती समोरील पार्किंगच्या जागेमध्ये एक अनधिकृत टपरी उभारण्यात आली आहे. या टपरी मुळे आमची दुकाने झाकली जातात असा आरोप या इमारतीमधील अंध गाळेधारक गणेश माताडे तसेच तौसिफ पठाण, मुशताक मनियार, जलिल अंसारी, प्रमोद पिंगळे, शकिल मोमीन आदी गाळेधारकांनी केला आहे.


दरम्यान याबाबत नारायणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर टपरी ही एका गाळेधारकाला देण्यात येणार असून तो गाळेधारक पूर्व वेशीच्या समोर असलेल्या स्वच्छतागृहाच्या शेजारी फुलाचे दुकान करून व्यवसाय करीत आहे. या गाळेधारकाचा आणि मूळ मालक असलेल्या गाळेधारकाचा वाद अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळे पर्यायी जागा म्हणून ही टपरी त्याला देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी नाईकरे यांनी सांगितले. मात्र कोणाचे ऑब्जेक्शन अथवा हरकत असल्यास याबाबत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल असेही नाईकरे यांनी सांगितले.
दरम्यान अशाप्रकारे नारायणगाव मध्ये रिकामी जागा दिसली की तेथे गाळे बांधा व अतिक्रमण करा असा कारभार सध्या चालू असल्याची टीका दृष्टिहीन असलेले गाळेधारक गणेश माताडे व अनेक नागरिकांनी केली आहे.