कारखान्यांमधील अतिरिक्त ऑक्सीजनचा साठा ताब्यात घ्या…..विशाल वाकडकर

भरारी पथकाव्दारे कारखान्यांमधील ऑक्सीजनचा साठा तपासून कारवाई करा.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि. 21 एप्रिल 2021 कोरोना कोविड -19 च्या रोज वाढत जाणा-या रुग्ण संख्येमुळे पिंपरी चिंचवड शहरात ऑक्सीजनची रोजच मागणी वाढत आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे हजारो रुग्ण मनपाच्या विविध रुग्णालयांमध्ये आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील अनेक रुग्णांना ऑक्सीजनची गरज असते. परंतू मागील पंधरा दिवसांपासून शहरातील अनेक रुग्णालयांना ऑक्सीजनचे सिलेंडर मिळत नाहीत. आमची शंभर टक्के खात्री आहे की, पिंपरी चिचंवड, चाकण, तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील अनेक कारखान्यांनी त्यांना औद्योगिक उत्पादनासाठी गरज म्हणून ऑक्सीजनचा मोठा साठा केला आहे.

यामध्ये त्यांच्या औद्योगिक सिलेंडरसह वैद्यकीय सिलेंडर देखील साठा करुन ठेवले आहेत. अशा कारखान्यांवर विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी, मनपाचे आयुक्त आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र भरारी पथक नेमून ऑक्सीजनचा अतिरिक्त साठा करणा-या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.
बुधवारी (दि. 21 एप्रिल) रोजी पहाटे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रुग्णालयांत ऑक्सीजनचा साठा संपत आल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. याचे गांभिर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि काही लोक प्रतिनिधींनी अथक प्रयत्न करुन संबंधित रुग्णालयांना ऑक्सीजन सिलेंडर मिळवून दिले. तर अनेक रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्यास कोण जबाबदार आहेत. याची चौकशी तज्ञांच्या समिती मार्फत केली जावी. तसेच पुढील काळात अशी परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून नियंत्रण कक्षाव्दारे दर चोविस तासाने ऑक्सीजनच्या उपलब्ध साठ्याची माहिती घेऊन त्याचे नियोजन करावे.
आमच्या माहितीमध्ये असेही निर्दशनास आले आहे की, पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील अनेक कारखान्यांनी त्यांच्या उत्पादनासाठी पुढील महिनाभराचा ऑक्सीजनचा साठा करुन ठेवला आहे. यामध्ये औद्योगिक सिलेंडरसह वैद्यकीय सिलेंडरचा अतिरिक्त साठा केला असल्याचे खात्रीशीर माहिती आहे. अशाच प्रकारे चाकण, तळेगांवसह जिल्हातील इतर औद्योगिक पट्ट्यांतील अनेक कारखान्यांमध्ये देखिल ऑक्सीजनचा अतिरिक्तसाठा केला असण्याची शक्यता आहे.
औद्योगिक उत्पादन सुरळीत राहणे गरजेचे आहे. परंतू ऑक्सीजन अभावी एखाद्या रुग्णाचा जीव जाणे हे देखिल गंभीर आणि चिंताजनक आहे. मागील एक वर्षापासून कोरोनाच्या भितीच्या सावटाखाली सर्व लोक आहेत. मार्च 2020 ला सुरु झालेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत असतानाच दुसरी लाट आलेली आहे. आज पर्यंत पिंपरी चिंचवड हद्दीतील 2444 नागरिक कोरोनामुळे दगावले आहे. अनेक रुग्ण बेड उपलब्ध होत नाही म्हणून घरी अथवा खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रशासनाला याचे गांभिर्य नसल्यासारखे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा वापर करून, शहर भागातील औद्योगिक वापरासाठी असलेला ऑक्सिजन साठा आपण अधिग्रहित करू शकतो. केंद्र सरकारनेही दिनांक 22 एप्रिल 2021 पासून बहुतेक उद्योगांना ऑक्सिजन वापरण्यास बंदी घातलेली आहे. शहरातील उद्योगांकडे असेलेला ऑक्सिजन साठा सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. याची दखल आपण घ्यावी अशीही मागणी वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *