लॉकडाऊन काळात, ब्रेक दि चैन चा असाही सदुपयोग खासदार श्रीनिवास पाटील यांचा साधेपणा

सातारा :- दि १२ एप्रिल २०२१
परवा विकेंड लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. खासदार श्रीनिवास पाटील साहेबांना भेटण्याची इच्छा झाली. साहेब कुठं आहेत यांची माहिती घेतली तर कराड मधील गोठे येथील निवासस्थानी होते. मी, दिनकर थोरात, सुहास पाटील अशा तिघांनी तिकडं मोर्चा वळवला. गेटवर वॊचमनने सांगितले गहू काढायचे चालले. आम्ही पुढं गेलो तर निवासस्थाना पाठीमागच्या शेतात साहेब डोक्याला टापर गुंडाळून वाकून गहू काढत होते. आम्हाला पाहिलं की नेहमीच्या शैलीत ‘ राम राम ‘ अस स्वागत केलं, तरी पण खाली वाकून दोन – तीन पेंडया काढल्याच..वयाच्या 81 व्या वर्षीचा साहेबांचा उत्साह पाहून थक्क झालो. साहेबांनी त्यांचं आटोपलं आणि माहिती द्यायला लागले. यावर्षी या शेतात भात केला होता. भात काढल्यानंतर शेतात पाणी साठवून होतं म्हणून खपली गहू टोकायला उशीर झाला. आता चांगला गहू आलाय. जेवढं आपल्याला लागेल तेवढं ठेवायचं अन बाकीच वाटून टाकायचं. शेजारी असलेली वांगी, टोमॅटोची भाजी आणि कलिंगड ही पूर्ण सेंद्रिय आहेत. तोपर्यंत कुणाला तरी हाक दिली कलिंगड कापून आण रे….


खासदार श्रीनिवास पाटील या माणसाची अनेक रूपं महाराष्ट्रान बघितलीत त्यापैकी हे एक रूपं, साहेब प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त, खासदार, राज्यपाल अशा प्रत्येक पदांवर असताना इतिहासात नोंद होईल असं काम केलं. खासदार म्हणून एकीकडं अस्सलिखित इंग्रजीत भाषण करून संसदेतील सर्वांचं लक्ष वेधून घेतात तर मतदार संघात असले की कुठल्यातरी वाड्या पाड्या वरच्या भाबड्या माणसाला त्याच्याच भाषेत गप्पा मारतात. आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याची त्यांची धडपड सुरू असते. कुठल्या अधिकाऱ्याला फोन केला की काम होणार हे ही त्याना पक्कं माहीत असत.
यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत तयार झालेली व्यक्तिमत्त्व आता दुर्मीळ झालेत. यशवंतरावांचा सहवास पाटील साहेबांना लाभला. यशवंतरावांना वाटायचं अधिकाऱ्याला हो म्हणता आलं पाहिजे आणि राज्यकर्त्याला नाही म्हणता यायला पाहिजे. पाटील साहेब यशवंतरावांच्या स्वप्नातले अधिकारी झाले आणि राज्यकर्ते ही झाले. इतकी विविध रूपं असणारा, इतका व्यासंग असणारा, इतकं साधं राहणारा राज्यकर्ता….

  • संभाजी थोरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *