लसीकरणाच्या कमतरतेमुळे गोवरचा उद्रेक

१७ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


लसीकरणाबाबत असलेले गैरसमज, जनजागृतीचा अभाव हे गोवरच्या उद्रेकामागील मुख्य कारण असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे आणि गोवरचे रुग्ण शोधणे, यावर सध्या भर दिला जात आहे. लसीकरणाच्या माध्यमातून गोवर टाळता येऊ शकतो, याकडे वैद्यकतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. किती मुले लसीकरणापासून वंचित राहिली आहेत, याची यादी करून त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे.

कोरोनाकाळात लहान मुलांच्या नियमित लसीकरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. दोन वर्षे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत होती. कोरोनाच्या भीतीने पालकांनी मुलांना लसीकरणासाठी घेऊन जाणे टाळले. या पार्श्वभूमीवर गोवरसारखे विषाणुजन्य आजार डोके वर काढू लागले आहेत.

गोवर हा आजार पॅरामिक्सो व्हायरस कुटुंबातील विषाणूमुळे होतो. विषाणू प्रथम श्वसनमार्गावर हल्ला करतो आणि नंतर सर्दी किंवा थेट स्पर्शाने निरोगी लोकांना संक्रमित करतो. गोवरचा उद्रेक दर 2 ते 3 वर्षांनी दिसून येतो. कोरोना काळात लसीकरणावर परिणाम झाल्याने गोवरचा उद्रेक दिसून येत आहे. उच्च ताप आणि अंगावर पुरळ उठणे, खोकला, सर्दी ,लालसर डोळे, अशक्तपणा,भूक न लागणे ही गोवरची लक्षणे आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *