सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळली
रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१० ऑगस्ट २०२२
बेल्हे
गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील सततच्या पावसामुळे नाथा गुंजाळ यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सोमवार (दि.८) च्या रात्री अचानक भिंत पडली. भिंत कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली.या वेळी रात्री घरातील सदस्य बाजूच्या खोलीत झोपले असल्याने अनर्थ टळला.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सतत पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रविवार (दि.७) रोजी या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. तर मंगळवार (दि.९) रोजी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे बाजरी,मूग,उडीद,वटाणा,कोथिंबीर,मेथी,व फळभाज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवार (दि.७) गुळुंचवाडीत नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. तसेच या गावात पुरातून दुचाकीवरून वाहून जाणारे दोघेजण बचावले होते.