शीरूरच्या केशरताई सदाशिव (अण्णा) पवार यांना मिळाला, पुणे जिल्हा दुध संघाच्या पहिल्या महिलाध्यक्षा बनण्याचा मान

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
०४ एप्रिल २०२२

शिरूर


राज्यातील नावाजलेल्या व मोठया दुध संघात गणना होत असणारा सहकारी दुध संघ म्हणजे, पुणे जिल्हा सहकारी दुध संघ अर्थात कात्रज डेअरी होय. हा सहकारी दुध संघ, नेहमीच शरदचंद्र पवार यांच्या अधिपत्याखालीच असल्याचा इतिहास आहे. या सहकारी दुध संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, त्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा प्रचंड बाजी मारलेली असून, आपले वर्चस्व कायम ठेवलेले आहे. यंदा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींनी, शिरूर तालुक्याला खूप झुकते माप दिले होते. कारण या एकाच तालुक्यातुन तब्बल तीन उमेदवारांना राष्ट्रवादी पक्षाने संधी दिलेली होती. आणि विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार निवडूनही आले.

केशरताई सदाशिव (अण्णा) पवार यादेखील यंदा चौथ्यांदा निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या गळ्यात, दूध संघाच्या अध्यक्ष पदाची माळ पक्षश्रेष्ठींनी घातलेली आहे. इतक्या सिनियर असणाऱ्या महिला या केवळ केशरताईच असल्याने, त्या या पदासाठी दावेदार होत्या. त्यासाठी त्यांच्या पाठीमागे भक्कम फळी उभी होती. जरी शिरूर तालुक्याची, विधानसभेसाठी दोन भागांत विभागणी झालेली होती, तरी देखील पक्षाने दिलेला आदेश हा सर्वांनीच पाळत, सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणलेले होते. यात शिरूर-हवेलीचे आमदार अशोकबापू पवार तसेच आंबेगाव-शिरूर चे आमदार व राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी स्वतः लक्ष देऊन, सर्वांनाच एकत्र आणलेले होते. त्यामुळे ही निवडणूक, राष्ट्रवादीच्या हाती आधीच आलेली होती.
शिवाय या दोन्ही दोन्ही तालुक्यातील या दोन्ही नेत्यांना मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी, एकमुखाने राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधलेला होता.

तसेच केशरताई पवार यांचे पती व बालाजी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, सदाशिवअण्णा पवार हे देखील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार या सर्वांच्या नजीकचे असल्याने, त्यांचे पारडे जड होते. शिवाय केशरताई पवार यांचे दिर व शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांचेही राजकीय वलय प्रभावी असल्याने, ही निवडणूक सुकर बनलेली होती. तर शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत (काका) पलांडे, तसेच आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, तसेच शेकडो महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणूकित तालुक्यातील तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचे वचन पक्षाला दिलेले होते.

शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनीही, शिरूर तालुक्याच्या अनेक दौऱ्यांसह, पुणे जिल्ह्याचे अनेक दौरे करून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केलेले होते. शिवाय पक्षाच्या अन्य नेत्यांनीही सततचे दौरे करत, कार्यकर्त्यांशी जवळीक साधलेली होती. त्याचेच पर्यवसन म्हणून, सहकारातील अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठे यश मिळाल्याचे पाहायला दिसून आलेय. नुकत्याच झालेल्या सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांमध्येही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वत्रच प्रचंड यश मिळाल्याचे दिसून आलेय.

कात्रज डेअरी अर्थात पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या या निवडणुकीतही, राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत आपला दबदबा पुन्हा एकदा दाखवून दिलाय. केशरताई पवार यांना जिल्ह्यातील ७०२ मतदानापैकी ५४८ मतदान पडलेले होते. या प्रचंड मताधिक्यामुळे तसेच एक अभ्यासू व अनुभवी महिला या नात्याने, पक्षश्रेष्ठींनी सर्वानुमते त्यांची जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड केलीय. या निवडीचे संपूर्ण जिल्ह्यातून स्वागत होत असताना, शिरूर तालुक्यात तर प्रचंड आनंद साजरा होताना दिसतो आहे. केशरताई पवार या मूळच्या जातेगाव (मुखई) येथील असून, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद साजरा केलाय. शिवाय शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वच ठिकाणी फटाके फोडत आनंद साजरा केलाय. कारण, शिरूर तालुक्यातुन यंदा अध्यक्ष पदासह आणखी दोन संचालक निवडून आलेले असल्याने, सर्वांमध्ये खूप उत्साह दिसत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *