शिरूर नगर परिषदेच्या कचरा डेपोवर रात्रीस खेळ चाले : सीसीटीव्ही कॅमेरेही बंद

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१८ मार्च २०२२

शिरूर


शिरूर नगर परिषदेचा कचरा डेपो, पुणे नगर महामार्गावर बायपास ला लागून आहे. येथे शहरातील कचरा आणला जातो व त्याचे वर्गीकरण केले जाते. या ठिकाणाला अलीकडे स्वच्छता प्रेरणा उद्यान असे नाव दिलेले आहे. हा कचरा डेपो चहू बजूने बंदिस्त असून, मुख्य गेटवर वॉचमन असतो. येथे परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश नाही. कारण आतमध्ये कचऱ्याचा खजिना आहे. असे असतानाही दि. १५ मार्च २०२२ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास, येथील कचरा डेपोवर चार पाच हायवा ट्रक येऊन, तेथील विशिष्ट ठिकाणचा कचरा जे सी बी च्या सहाय्याने भरू लागले. ही बाब काही जागृत नागरिकांच्या लक्षात आली. त्यांना संशय येऊन, रात्रीच्या वेळेस असे काय काम कचरा डेपोवर चालले असावे ? हा प्रश्न त्यांना पडल्याने, त्यांनी तात्काळ याची तक्रार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांच्याकडे केली. त्यामुळे लगेचच महिबूब सय्यद, त्यांचे काही मित्र व काही पत्रकार घटनास्थळी गेले. कचरा डेपो बाहेरूनच त्यांनी या सर्व प्रकाराचे फोटो व व्हिडिओ घेतले.त्यामुळे रात्रीस चाललेला खेळ थांबला. याबाबत ची विचारणा महिबूब सय्यद यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्याकडे केली असता, ते याबाबत अनभिज्ञ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता हा प्रश्न निर्माण झालाय, की या सर्व हायवा गाड्या कुणाच्या परवाणगीने कचरा डेपोवर आल्या. जर मुख्याधिकारी यांची परवानगी नव्हती, तर मग कुणाच्या आशीर्वादाने या सर्व गाड्या रात्रीच्या वेळेस आल्या?विशेष म्हणजे या हायवा ट्रक चालकांना सय्यद यांनी विचारले असता, ते हा कचरा भरून येथून ३० की मी परिसरात कुठेही टाकून देणार होते, अशी माहिती समोर आली.


हा चाललेला सर्व प्रकार बेकायदेशीर असल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांचे म्हणणे असून त्याबाबतची लेखी तक्रार त्यांनी शिरूर नगर परिषदेकडे दिलीय. या प्रकाराबाबत व आणखी अनेक तक्रारी व सुचनांबाबत त्यांनी मुख्याधिकारी यांची समक्ष गाठ घेऊन, सविस्तर चर्चा केली. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष फिरोज सय्यद, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, शिवशंभू जिजाऊ सेनेचे तालुकाध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे, मनसे जनहित कक्षाचे माजी शहराध्यक्ष रवी लेंडे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले लेखी तक्रारीचे पत्र नगर परिषदेला दिलेय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *