एव्हिएशन रेग्युलेटर DGCA ने एअर इंडियाला ठोठावला ८० लाखांचा दंड

देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन्सपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपच्या Air India ला मोठा झटका बसला आहे. एक चूक कंपनीला खुप महागात पडली. आता या चुकीमुळे 80 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला उड्डाण सुरक्षा आणि क्रू मेंबर्सचा थकवा कमी करण्यासाठी बनवलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…
डीजीसीएला आपल्या तपासात आढळले की, एअर इंडियाने फ्लाइट क्रू मेंबर्सच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे योग्य पालन केले नाही. कंपनी क्रू मेंबर्सचे फ्लाइंग ड्युटी अवर्स, म्हणजेच कामाचे तास आणि त्यांचा थकवा लक्षात घेऊन वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करू शकली नाही. त्यामुळेच आता कंपनीला दंड ठोठावला आहे.

डीजीसीएने जानेवारीमध्ये एअर इंडियाचे ऑन-साइट ऑडिट केले होते. यात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले की, अहवाल आणि पुराव्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले की, काही प्रकरणांमध्ये एअर इंडियाने 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन क्रू सदस्यांसह उड्डाण केले होते. शिवाय, कंपनी आपल्या क्रू सदस्यांना पुरेशी साप्ताहिक विश्रांती आणि लांब उड्डाणांच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती देण्यात अयशस्वी ठरली. यानंतर डीजीसीएने 1 मार्च रोजी एअर इंडियाला या उल्लंघनाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला एअरलाइनने दिलेले उत्तर डीजीसीएला समाधानकारक आढळले नाही. त्यामुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *