श्री क्षेत्र आळंदी येथे प पू स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या ‘गीता भक्ती अमृत महोत्सवी’ कार्यक्रमाचा डॉ. भागवत यांच्या हस्ते शुभारंभ…

संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे.  हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

श्री क्षेत्र आळंदी  येथील प पू स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या ‘गीता भक्ती अमृत महोत्सवी’ कार्यक्रमाचा  शुभारंभ डॉ. भागवत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वामी राजेंद्रदास महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य  भैयाजी जोशी, सदानंद महाराज, मारोतीबाबा कुरेकर महाराज, लोकेशमुनी, प्रणवानंद महाराज आदिंची प्रमुख उपस्थिती होती. अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवर, संतांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

राष्ट्रातील शाश्वत मूल्यांची जपणूक व आचरण करणे हे सर्व संत महंतांचे योगदान महत्त्वपूर्ण असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून  विविध संत महंत एकत्रित येऊन प्रबोधन करणार आहेत, हा अमृत योग असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. महाभारतानंतर ज्याप्रमाणे नैमिषरण्यात ऋषी संमेलन होऊन शास्त्रावर मंथन झाले, त्याचप्रमाणे इथेही या निमित्ताने अनेक संत महंत एकत्रित येत आहेत.त्यातून विश्व कल्याणासाठी मंथन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. भागवत पुढे  म्हणाले, अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामलला विराजमान झाले आहेत.  जे जे मंगल घडते आहे ती ईश्वराची इच्छा आहे. देशातील महापुरुष, संत महात्म्यांच्या सामर्थ्य आणि  पुरुषार्थामुळे  हे शक्य होत आहे. ही नियतीची योजना आहे, जे झोपले आहेत त्यांना जागे करण्यासाठी संत  कायम प्रयत्नरत असतात.ज्ञानाचे अनुसंधान करणारे ऋषी असतात व ते सर्वत्र पोहचविण्यासाठी घुमंतू बंधू पुरातन काळापासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील बांधव हे संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान समजू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु ते जुन्या काळापासून अनेक छोटे छोटे विज्ञाननिष्ठ प्रयोग करीत असतात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.

श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे जनमानसात असणारे गुण आहेत. त्यात सातत्य ठेवण्याचे काम संत, विद्वान करत असतात. त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी ईश्वर निष्ठाची मांदियाळी  मागितली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे स्पष्ट केले. त्यामुळेच असे सात्त्विक कार्यक्रम होणे ही नियतीची इच्छा आहे.

जग बदलत असले तरी आपण आपले मूळ विसरू नये. ज्ञान आणि विज्ञान याची आपल्याकडे परंपरा आहे. आपल्याला विश्वाला ज्ञान द्यायचे आहे. भारत विश्वगुरू होण्यासाठी  आपण सातत्याने प्रयत्नरत राहायला हवे.

याठिकाणी होत असलेले संत संमेलन हे ज्ञान आणि भक्तीच्या संगमातून होत आहे. कर्माविना भक्ती अपंग असून गीतेतील ज्ञान, कर्म, भक्ती या पायावर सर्वांनी लक्ष केंद्रित करून येथील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भागवत केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रकाशित केलेले डाक तिकीट स्वामी गोविंद देव गिरी महाराजांना  यावेळी भेट म्हणून पाठवले . भाजपचे माजी उपाध्यक्ष शाम जाजू, आ. महेश लांडगे यांच्या उपस्थितीत डॉ. मोहन भागवत यांनी ते प्रदान केले.

यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशभक्तीचे मुक्त विद्यापीठ असून सेवाव्रती कार्य करत राहणार असल्याचे सांगितले. सर्व न्यासाचे केंद्र – भगवदगीता असून आळंदी मध्ये बसून श्रीमद्भभागवत श्रवण करणे हीच मनोकामना आहे. देश से प्रेम तो हर पल कहना चाहिए मैं रहू या ना रहू ये देश रहना चाहिए.अशी भावनिक देशभक्तीपर साद त्यांनी उपस्थितांना घातली.

यावेळी निष्काम कर्मयोगी श्रीधरपंत फडके, डॉ.शरद हेबाळकर, मुकुंदराव गोरे,प्रकाश सोमण, अशोक वर्णेकर यांचा  यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी लिहिलेल्या महाभारत विषयक पहिल्या खंडाचे प्रकाशन यावेळी झाले.

कार्यक्रमाचे   सूत्रसंचालन गीता परिवाराचे संजय मालपाणी यांनी केले. प्रास्ताविक  गिरिधर   काळे यांनी तर आभार  आनंद राठी यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *